नवी मुंबई : नवी मुंबईत ज्यांच्या मालकीचे घर नाही अशांना नियोजित वसाहतीमध्ये हक्काचे घर मिळण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजनेतून अत्यल्प, अल्प उत्पन्न गटासाठी ही घरे बांधत असून या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात असाव्यात यासाठी गुरुवारी झालेल्या सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दर परवडणारे असावेत अशा सूचना सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हे दर सरकारी बाजारमूल्याच्या (रेडीरेकनर) दरापेक्षा कमी किमतीमध्ये किंवा त्या किमतीच्या तुलनेत सर्वसामान्यांना परवडणारे असावेत, असेही ते म्हणाले.
नवी मुंबईत ज्यांच्या मालकीचे घर नाही, अशा नागरिकांसाठी नवी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांशेजारी हक्काचे घर खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी सिडको मंडळ देणार आहे. सिडको मंडळ ६७ हजार घरांचे बांधकाम करत असून त्यापैकी २५ हजार घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून याच घरांची सोडत प्रक्रियेचे अर्ज नोंदणी महात्मा गांधी जयंतीला म्हणजे २ ऑक्टोबर रोजी नागरिक करू शकतील, अशी माहिती गुरुवारी संजय शिरसाट यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
खांदेश्वर, मानसरोवर, खारघर व इतर रेल्वे स्थानकांपासून हाकेच्या अंतरावर या सदनिका उंच इमारतींमध्ये उपलब्ध होणार आहेत. सदनिका, इमारत व मजला निवडण्याची संधी सिडकोने ऑनलाइन सोडतीमध्ये ठेवल्याने ग्राहकांना त्यांच्या पसंतीची सदनिका व मजला निवडता येणार आहे. अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग आहे.
या सोडत प्रक्रियेमधील घरांच्या किमती खासगी विकासकांपेक्षा कमी असल्याने मोठ्या प्रमाणात सिडकोकडे या सोडतीमधून महसूल जमा होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा…पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या महागृहनिर्माणाला गती
दसऱ्याऐवजी गांधी जयंतीला सोडत
मागील तीन दिवसांपूर्वी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देताना सिडकोच्या घरांची सोडत दसऱ्याच्या मुहूर्तावर काढणार असल्याची माहिती दिली होती. मात्र गुरुवारी संचालक मंडळाची बैठक पार पडल्यानंतर सिडकोचे अध्यक्ष शिरसाट यांनी संबंधित सोडतीसाठीच्या अर्जाच्या नोंदणीचा मुहूर्त २ ऑक्टोबर हा जाहीर केल्याने संपूर्ण सोडतीचा मुहूर्तच बदलून टाकल्याची चर्चा सिडकोत सुरू होती. सिडकोचा पदभार स्वीकारल्यावर पहिल्याच बैठकीत अध्यक्ष शिरसाट यांनी सिडकोच्या कारभाराच्या निर्णय प्रक्रियेत लोकनियुक्त अध्यक्ष हाच सिडकोचा मुख्य कारभारी असल्याची चुणूक सिडको प्रशासनातील अधिकाऱ्यांना दाखवून दिल्याची चर्चा आहे.