नवी मुंबई : सिडको महामंडळाने राबविलेल्या २६ हजार घरांच्या विक्रीसाठी खासगी सल्लागार कंपनीला सल्लागार म्हणून नेमले होते. या कंपनीला उर्वरीत देयकाची रक्कम देण्याचा ठराव नुकताच सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अजून विजेत्यांना त्यांची हक्काची घरे ताब्यात मिळाली नाहीत, माघार घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. घरांच्या क्षेत्रफळावर विजेते नाराज आहेत, असे विविध प्रश्न अनुत्तरित असताना विक्रीसाठी नेमलेल्या कंपनीला देयक देण्याची घाई का केली जाते, अशी चर्चा सिडकोत सुरू आहे.

५५ वर्षांच्या सिडकोच्या कारकिर्दीत पहिल्यांदा सिडकोने घरविक्री करण्यासाठी खासगी सल्लागार कंपनीची नेमणूक केली. दुसरीकडे घरविक्रीसाठी सिडकोने जाहिरातींवर लाखो रुपये खर्च केले. तसेच सिडकोच्या आणि इतर शासकीय जागेवरच या सल्लागार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काम केले. तरीही प्रति घर एक लाखांपेक्षा अधिक म्हणजे कोट्यवधी रुपयांची दौलतजादा या कंपनीवर केली जात आहे.

राज्य सरकारने सर्वच शासकीय संस्थांना काटकसरीचा सल्ला दिला आहे. मात्र सिडकोच्या काही अधिकाऱ्यांना सल्लागार कंपनीच्या देयकाची चिंता आहे. या कंपनीला उर्वरीत देयक देण्यासाठी सिडकोमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. आणि याच कंपनीला त्यांचे उर्वरीत देयक देण्यासाठी एकाच महिन्यात दोनवेळा संचालक मंडळात याविषयीचा ठराव घेण्यात आला. पहिला निर्णय ३ मार्चच्या बैठकीत आणि दुसरा निर्णय २७ मार्चच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. सुमारे ६७० कोटी रुपयांचा ठेका या कंपनीला देण्यात आला. आगाऊ रक्कम म्हणून १०४ कोटी रुपये घरविक्रीपूर्वी या कंपनीला देण्यात आले. ६७ हजार घरांपैकी पहिल्या टप्यात २५,७२३ घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली. त्यामध्ये १९,५१८ विजेत्यांपैकी ३ हजारांहून अधिक विजेत्यांनी आतापर्यंत माघार घेतल्यामुळे १६,५०० घरांपैकी अजून किती विजेते माघार घेतील याचे मूल्यांकन झाल्यानंतरच संबंधित कंपनीला त्यांचे देयक द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

कंपनीला देयक रक्कम देण्यासंदर्भात नव्याने कोणताही निर्णय सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला नाही. परंतू पुन्हा या कंपनीला उर्वरित घरविक्रीसाठी नेमण्याचा निर्णय सिडकोने जरुर घेतला आहे. २५ हजार घरांपैकी १९ हजार घरांची विक्री झाली. उर्वरित घर विक्रीसाठी नव्यान सोडत प्रक्रिया राबवली जाईल त्यावेळी संबंधित कंपनीकडून ही घरविक्री करुन घेतली जाईल. जी काही रक्कम संबंधित कंपनीला दिली जाईल. ती अगदी करारानूसार दिली जाईल. -विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको मंडळ