नवी मुंबई : शिवजयंतीच्या मुहूर्तावर बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेची सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीमध्ये ज्या १,८८१ अर्जदारांना त्यांच्या पसंतीप्रमाणे घरे मिळाली नाही, अशांसाठी सिडकोने यापुढील सोडतीमध्ये संबंधित अर्जदार अर्जशुल्क न भरता सहभागी होऊ शकतील असा पर्याय उपलब्ध ठेवला आहे. या अर्जदारांना नव्या सोडतीत सहभागी होण्यासाठी नव्याने अर्ज करण्याची तसेच शुल्क भरण्याची गरज भासणार नाही असे सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शान्तनू गोयल यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या चार महिन्यांपासून २५,७२३ घरांची सोडत प्रक्रिया सिडको महामंडळाने राबविली. १९,५१८ अर्जदारांना सोडतीमध्ये घर लागल्याचे सिडकोने जाहीर केले. शेकडो अर्जदारांना त्यांच्या निवडीप्रमाणे सिडकोचे पसंतीचे घर मिळाल्याने अर्जदारांनी आनंद व्यक्त केला. या सोडत प्रक्रियेमध्ये २१,३९९ अर्जदारांनी अनामत शुल्क भरले होते. या सोडतीला सुरूवातीला १ लाख ६० हजार अर्जदारांनी सहभाग दर्शविला. मात्र घरांच्या किमती व इतर कारणांमुळे या सोडतीमध्ये २१,३९९ अर्जदारांनी पसंती दाखविली. राज्यात एकाच सोडतीमध्ये १९,५१८ अर्जदारांना घरे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सोडतीचा निकाल जाहीर झाल्यानंर हजारो अर्जदारांनी आनंद व्यक्त केला. ही सोडत चार वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये पार पडली. यातील पहिल्या फेरीत १२,४२० अर्जदारांना, दुसऱ्या फेरीत ६१३ आणि तिस-या फेरीमध्ये ४०४ अर्जदारांना त्यांनी निवडलेल्या पर्यायाप्रमाणे घरे लागली. या सोडतीमध्ये सिडकोने चौथ्या फेरीचा वेगळा पर्याय अर्जदारांना दिला. या पर्यायानुसार अर्जदारांच्या निवडीचे तीन पर्याय संपल्यानंतर चौथी फेरी सिडको ऑनलाइन पद्धतीने काढणार होती. याच चौथ्या फेरीत तब्बल ६,०८१ अर्जदारांना ऑनलाइन प्रणालीने घरे लागली. ऑनलाइन प्रणालीने निवडलेली घरे अर्जदारांना पसंत पडतील का याकडे सिडकोच्या अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ज्या अर्जदारांनी अनामत रक्कम भरली मात्र घरे लागली नाहीत, अशांना सोडत प्रक्रियेत ठरल्याप्रमाणे त्यांची अनामत रक्कम परत केली जाईल. परंतु ज्या अर्जदारांना पुन्हा नवीन सोडत जाहीर झाल्यावर सोडतीत सहभाग घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जासोबत भरलेले अडीचशे रुपये अर्ज शुल्क सिडकोकडे तसेच कायम असल्याने नव्या सोडत प्रक्रियेत त्यांना अर्जशुल्क भरावे लागणार नाही. जेव्हा सिडको २५,७२३ घरांच्या सोडतीमधील उरलेल्या घरांची आणि सोबत नवीन घरांची सोडत काढेल त्यावेळी हे अर्जदार त्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. – शान्तनू गोयल, सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको मंडळ