विमानतळासाठी प्रकल्पग्रस्तांसोबत चर्चेला सुरुवात

‘नवी मुंबई विमानतळ हा सिडकोचा प्रकल्प नसून तो देशाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीत सर्व प्रकल्पग्रस्तांनी सहकार्य करावे’ या सिडको व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानंतरही काही प्रकल्पग्रस्त नेते आडमुठी भूमिका घेत असल्याने हा प्रकल्प इतरत्र हलविता येईल का याची चाचपणी सुरु करण्यापूर्वी विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोने मंगळवारपासून एक संपादनाची धावपट्टी (रन वे) तयार करण्यास सुरुवात केली आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी मंगळवारी विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांच्या चिंचपाडा व कोपर गावातील सार्वजनिक गणेशोत्सवांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांशी अनऔपचारिक  चर्चा केली. त्यामुळे सिडको व प्रकल्पग्रस्तांमध्ये काही महिन्यापासून बंद पडलेली चर्चेच्या फेऱ्या पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबईतील विमानतळाच्या प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्यात आली आहे. पंधरा हजार कोटी रुपये खर्च आणि दोन हजार हेक्टर जमिनीवरील या प्रकल्पातील सिडकोने आपल्या अखत्यारीतील काही महत्वाच्या स्थापत्य कामांना सुरुवात केली आहे. या प्रकल्पासाठी पनवेल तालुक्यातील दहा गावांना इतरत्र स्थलांतरीत करणे आवश्यक आहे.

त्यासाठी जवळच्या दोन गावांलगतची जमिन आरक्षित ठेवण्यात आली असून तेथे नवीन घर बांधेपर्यंत प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला दीड वर्षांचे भाडे देण्याची तयारीही सिडकोन दर्शवली आहे. जुलै महिन्यापासून सुरु होणाऱ्या या ऐन स्थलांतराच्या वेळी प्रकल्पग्रस्त नेत्यांनी काही नवीन मुद्दे पुढे केल्याने संपूर्ण विमानतळ प्रक्रियाच ठप्प होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यात केंद्रीय नागरी विमान उड्डाणमंत्री राजू गजपती यांनी हे विमानतळच कल्याण येथे स्थलांतरीत करण्याचे सूतोवाच काही दिवसापूर्वी मुंबईत केले आहे. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्त, बांधकाम व्यवसायिक, गुंतवणूकदार, यांच्यात हलचल निर्माण झाली आहे. विमानतळाच्या निमित्ताने या भागाचा होणारा सुनियोजित विकास विमानतळ स्थळांतराने खुंटणारा असल्याचे अनेक जाणकरांचे मत आहे. केंद्र सरकार असा काही टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी कोणताही गाजावजा न करता अचानक भेट देऊन गणेश चतुर्थीनंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी कोपर गावातील गणपती मंदिरात काही ग्रामस्थांबरोबर चर्चा केली. त्याचबरोबर चिंचपाडा येथील काळभैरव मंदिरात काही विमानतळ संघर्ष समितीच्या आजी माजी नेत्यांबरोबर विमानतळ प्रकल्पात निर्माण झालेला तिढा कसा सोडवायचा याबाबत सल्ला मसलत करण्यात आली. आगरी कोळी समाजात गणेशोत्सवाला एक अन्यन्यसाधारण महत्व आहे. गणरायाच्या ६४ कलापैकी संवाद ही एक कला असल्याने या काळात सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सुरु केलेला संवाद अशाच प्रकारे पुढे सुरु ठेवणार असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. या निमित्ताने सिडकोने सुरु केलेली ही संवादाचा रणवे यानंतर अशाच प्रकारे पुढील गावात जाणार आहे.

विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचा विरोध नाही. त्यांच्या सहकार्यामुळेच प्रकल्प इथपर्यंत पोहोचू शकला आहे आणि तो पुढेही यशस्वी होणार आहे. त्यांच्या काही मागण्या आहेत. त्या अवास्तव असू नये अशी सरकारची अपेक्षा आहे. ज्या सोडविणे शक्य आहे त्यात सिडको क्षणाचाही विलंब लावणार नाही. गणेशोत्सव काळात सुरु झालेली ही चर्चा अशीच सुरु राहावी आणि पुढील वर्षांचा गणेशोत्सव प्रकल्पग्रस्ताबरोबर साजरा करता यावा.

भूषण गगराणी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको.

Story img Loader