जयेश सामंत-संतोष सावंत, लोकसत्ता
नवी मुंबई</strong> : नवी मुंबईचा ‘क्वीन्स नेकलेस’ अशी ओळख असणाऱ्या पाम बीच मार्गावर सिडकोने महाराष्ट्रातील आमदार, खासदारांसाठी आलिशान घरांचा गृहप्रकल्प उभारण्याचे निश्चित केले आहे. १ जानेवारी २०२० नंतर निवडून आलेले आमदार, खासदार यांच्यासह सर्वोच्च, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनाही या प्रकल्पात घरे खरेदी करता येणार आहेत. १२७० ते १८०० चौरस फूट आकाराच्या या घरांची विक्री किंमत सव्वादोन कोटी रुपयांपासून तीन कोटी ११ लाखांपर्यंत असणार आहे.
नवी मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असणारा बेलापूर ते वाशीदरम्यानचा पाम बीच मार्ग हा सुरुवातीपासूनच महागडय़ा घरांचा केंद्रबिंदू ठरला आहे. एका बाजूला विस्तीर्ण खाडीकिनारा लाभलेल्या या मार्गाला लागूनच सिडकोने काही वर्षांपूर्वी अनिवासी भारतीयांसाठी मोठा प्रकल्प उभारला. याच मार्गावर बेलापूरच्या दिशेने नवी मुंबई महापालिकेने अद्ययावत असे मुख्यालय उभारले असून, या मार्गावरील गगनचुंबी इमारतींमधील घरांची मुंबई महानगर क्षेत्रातील महागडय़ा घरांमध्ये गणना होते. आता याच मार्गावर राज्याच्या नगरविकास विभागाच्या परवानगीने सिडकोकडून आमदार, खासदारांसह अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील ‘एमटीएनएल’ सेवा ठप्प; कंत्राटाचे नूतनीकरण वेळेत न झाल्याचा फटका
मार्च २०२२ मध्ये विधान परिषदेचे तत्कालीन सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या एका बैठकीत सिडकोने अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी लॉटरी पद्धतीने विक्रीसाठी अशापद्धतीने घरांची उभारणी करावी, असे निर्देश देण्यात आले होते. त्यासाठी आवश्यक धोरण तयार करण्याचेही सिडकोला सुचविण्यात आले होते. यानुसार सिडकोने जून २०२२ मध्ये पाम बीच मार्गावर सेक्टर १५ ए येथील भूखंड क्रमांक २० येथे ८७५ घरांचा हा प्रकल्प उभा करण्यासाठी विशेष धोरणाला मंजुरी दिली होती. यामध्ये ९२० चौरस फुटांची ( कारपेट) २००, एक हजार २० चौरस फुटांची १५०, एक हजार २७० चौरस फुटांची १५० आणि १४५० चौरस फुटांच्या १७५ घरांची उभारणी करण्याचे ठरले होते. याशिवाय १८०० चौरस फुटांची चार बेडरुम असलेली सर्वात मोठी २०० घरेही या प्रकल्पात उभी केली जाणार होती. दरम्यान, या प्रकल्पासाठी सिडकोला येणारा खर्च आणि संभाव्य मागणीचे गणित लक्षात घेता आता दोन आणि अडीच बेडरुमची ३५० घरे या योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार तीन, साडेतीन आणि चार बेडरुमची ५२५ घरे या प्रकल्पात उभारली जाणार आहेत. यासंबंधी सिडकोच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता अशा प्रकल्पाच्या उभारणीस संचालक मंडळाची मान्यता मिळाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याविषयी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
तुलनेने स्वस्त घरे?
पाम बीच मार्गावर वेगवेगळय़ा बिल्डरांमार्फत उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांमधील घरांच्या किमती सिडकोने आखलेल्या या प्रकल्पांपेक्षा खूपच जास्त असल्याचे चित्र आहे. या मार्गावर नेरुळ परिसरात एका मोठय़ा बिल्डरकडून २५ मजली इमारतीचा गृहप्रकल्प उभारण्यात येत असून, त्यामधील १८०० ते २००० चौरस फुटांच्या घराची किंमत १० ते १३ कोटी रुपये आहे. याच भागात १००० चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळ असलेल्या घरांच्या किमती किमान चार ते साडेचार कोटी रुपयांपासून सुरू होतात, अशी माहिती एका प्रथितयश बिल्डरने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.