नवी मुंबई : खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी आणि घणसोली येथील १४ हजार ८३८ घरांसाठी सिडकोने दोन महिन्यांपूर्वी काढलेल्या सोडतीतील शिल्लक राहिलेल्या ११०० घरांची सोडत १४ फेब्रुवारीला काढण्यात येणार आहे. पत्रकार, माथाडी, प्रकल्पग्रस्त आणि सिडको कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित असलेली ही ११०० घरे शिल्लक राहिली असून ती आता सर्वसाधारण गटासाठी जाहीर करण्यात आलेली आहेत. दोन महिन्यांपूर्वीच्या सोडतीत घर न मिळालेले ग्राहक या घरांसाठी पुन्हा अर्ज करू शकणार आहेत.

मंगळवारपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज छाननीनंतर १४ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता बेलापूर मुख्यालयात सोडत होणार आहे. सिडकोने अनेक वर्षांनंतर गृहनिर्मितीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. ऑक्टोबर मध्ये १४ हजार ८३८ घरांची सोडत काढल्यानंतर आता ९० हजार घरांच्या सोडतीची घोषणा केली आहे. पुढील तीन महिन्यांत या घरांचीही सोडत निघण्याची शक्यता आहे. १४ हजार ८३८ घरांची सोडत काढल्यानंतर या घरांतील ११०० घरे शिल्लक राहिली आहेत. राखीव वर्गासाठीची ही घरे आता सर्वसामान्यांसाठीही खुली करण्यात आली आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी या घरांच्या अर्जाची ऑनलाइन विक्री सुरू करण्यात आली.

Story img Loader