चार अर्जदार अपात्र; यूटय़ूब व फेसबुकवर थेट प्रक्षेपण
नवी मुंबई : सिडकोच्या महागृहनिर्मितीत गेल्या वर्षी शिल्लक राहिलेल्या एक हजार १०० घरांच्या सोडतीला गुरुवारी सकाळी ११ वाजता बेलापूर येथील सिडकोच्या मुख्यालयात सुरुवात होणार आहे. सर्वसामान्यांसाठी खुल्या असलेल्या या घरांसाठी एकूण ५८ हजार ७८६ अर्ज आले असून यातील ११०० ग्राहक भाग्यवंत ठरणार आहेत. केवळ चार ग्राहक या सोडतीत अपात्र ठरले आहेत. दुपापर्यंत ही सोडत पूर्ण होण्याची शक्यता असून या सोडतीचे थेट प्रक्षेपण सिडकोच्या यूटय़ूब व फेसबुक पेजवर उपलब्ध होणार आहे.गेल्या वर्षी १४ हजार ८३८ घरांची दोन ऑक्टोबरला गांधी जयंती निमित्ताने सोडत काढण्यात आली होती. त्यातील प्रकल्पग्रस्त, पत्रकार, माथाडी, मापाडी, सिडको कर्मचारी व यांच्यासाठी राखीव असलेल्या घरांतून १ हजार १०० घरे शिल्लक राहिली होती. या घरांना राखीव संवर्गातून मागणी न आल्याने ती आता सर्वसामान्य गटातील नागरिकांसाठी खुली करून त्याची नवीन वर्षांच्या सुरुवातीला विक्री सुरूकरण्यात आली. या घरांची सोडत सिडकोच्या मुख्यालयातील सातव्या मजल्यावरील सभागृहात सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे.
प्रियजनांसाठी एक अनमोल भेट
या घरांवर असलेले आरक्षण उठविण्यात आल्याने खुल्या वर्गातील सर्व ग्राहक आहेत. यापूर्वी मागणी केलेल्या ठिकाणी घर उपलब्ध नसल्यास कुठेही उपलब्ध असलेल्या ठिकाणी देण्यात यावे या पर्यायाला वाव राहणार नाही. कारण घरे शिल्लक राहण्याची शक्यता नाही. गुरुवारची सोडत ही प्रेमदिनी होणार असल्याने भाग्यवंतांना लागणारे घर हे आपल्या प्रियजनांसाठी एक अनमोल भेट ठरणार आहे.
शिल्लक राहिलेल्या घरांची गुरुवारी सोडत काढली जाणार आहे. यात ११०० ग्राहक भाग्यवंत ठरणार आहेत. यादी जाहीर केली जाणार असून कागदपत्रांची नंतर छाननी होणार आहे. या महागृहनिर्मिती सोडतीमुळे आता ऑनलाइन सोडतीची एक प्रक्रिया तयार झाल्याने भविष्यातील ९० हजार घरांच्या सोडतीसाठी सिडको तयार आहे.
-लक्ष्मीकांत डावरे, पणन अधिकारी, सिडको