अमृतधाम, दुर्गा माता प्लाझा, अवधूतछाया, दत्तकृपावर कारवाई
दिघा येथील सिडकोच्या भूखंडावर अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या चार इमारती जमीनदोस्त करण्यासाठी सिडकोने कंबर कसली आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा म्हणून रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याला पत्र पाठवण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्त मिळाल्यांनतर इमारती जमीनदोस्त करणार असल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
दिघ्यातील एमआयडीसी व सिडकोच्या भूखंडावरील ९९ बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसीच्या भूखंडावरील तीन निवासी इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहे. तर मोरेश्वर, भगत, अंबिका, कमलाकर या चार इमारती सिल करण्यात आल्या आहेत. सिडकोच्या भूखंडावरील दुर्गा माता प्लाझा, अवधूतछाया, दत्तकृपा, अमृतधाम या इमारती कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यातून सिडकोच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. पण शासनाने २०१५ पर्यंतची घरे अधिकृत करण्याचा निर्णय घेतला असून तसा अध्यादेशदेखील काढला आहे.
या अध्यादेशच्या विरोधात उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र सिडकोने दुर्गा माता प्लाझा, अवधूतछाया, दत्तकृपा, अमृतधाम या इमारती जमीनदोस्त करण्यासाठी कंबर कसली असून रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याला पत्र पाठवून पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. सिडकोच्या या वृत्ताला रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत काटकर यांनीही दुजोरा दिला.
सिडकोने टाळे ठोकलेल्या चार इमारती जमीनदोस्त करण्याची तयारी केली आहे. पोलीस बंदोबस्त मिळताच त्या पाडण्यात येतील.
–सुनील चिडचोळे, अतिक्रमण अधिकारी, सिडको.