शहरांचे शिल्पकार आता केवळ खारघर नोडचे नियोजन पाहणार
‘शहरांचे शिल्पकार’ असे घोषवाक्य घेऊन नवी मुंबई, औरंगाबाद, नाशिक येथे शहरे वसविणाऱ्या सिडकोचा नवी मुंबईतील कारभार पनवेल महानगरपालिका स्थापनेनंतर जवळपास संपुष्टात येणार असून खारघर आणि पुष्पकनगर वगळता सर्व नोड पनवेल पालिकेत समाविष्ट होणार आहेत. सिडकोने खारघर हा विकसित व पुष्पकनगर हा अविकसित नोड असल्याने पनवेल महानगरपालिकेत देण्यास नकार दिला असून नैना क्षेत्राचा विकास, मेट्रो प्रकल्प व विमानतळाचे उड्डाण हे तीन मोठे प्रकल्प सिडकोकडे राहणार आहेत. त्यामुळे शहरांचे शिल्पकार ही बिरुदावली जाऊन बडय़ा प्रकल्पांचे नियोजनकार इतकी ओळख सिडकोची भविष्यात राहणार आहे.
बेलापूर, उरण, पनवेल तालुक्यांतील ९५ गावांशेजारील १७ हजार हेक्टर जमीन चाळीस वर्षांपूर्वी संपादित करून राज्य शासनाने नवी मुंबई शहर वसविण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविली होती. त्यानुसार खासगी, शासकीय व संपादित अशा ३४४ चौ.कि.मी. क्षेत्रफळावर नवी मुंबई शहर वसविण्यात आले असून जानेवारी १९९२ रोजी ग्रामपंचायतीमधून थेट नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली. त्यामुळे शहर नियोजनाचे उत्तरदायित्व स्वीकारलेल्या नवी मुंबई पालिकेला सिडकोने १९९४ नंतर टप्प्याटप्प्याने ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, जुईनगर, नेरुळ, सानपाडा, सीबीडी, सी वूड हे नोड हस्तांतरित केले. यात घणसोली येथील नोड मात्र अद्याप पालिकेला देण्यात आलेला नाही. येथील पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी गेली २२ वर्षे पालिका पार पाडत असून सिडकोचा जमिनीवर हक्क आजही कायम आहे. सिडकोने नागरिकांना विकलेली जमीनदेखील साठ वर्षांच्या भाडेपट्टय़ावर दिली असून मोकळी जागा आजही भाडेपट्टय़ाने दिली जात आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिका क्षेत्रात आता सिडकोचे अस्तित्व ‘जमीनदार’ म्हणून केवळ शिल्लक राहिले आहे. हीच स्थिती पनवेल महापालिका स्थापनेनंतर सिडकोची होणार असून येथील पनवेल, कळंबोली, कामोठे, उलवा हे शहरी भाग पनवेल महापालिकेत सामील केले जाणार असून खारघर व पुष्पकनगर पनवेल महापालिकेत देण्यास सिडकोने स्पष्ट नकार दिला आहे. सिडकोचे अनेक गृहनिर्माण प्रकल्प खारघर परिसरात येत असून ५५ हजार घरांपैकी ४० हजार घरे या भागात बांधली जाणार आहेत. खारघरप्रमाणे सिडकोकडे दुसऱ्या कोणत्याही भागात विस्तीर्ण जमीन शिल्लक राहिलेली नाही.
त्याचप्रमाणे सिडकोचा विमानतळानंतर दुसरा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मेट्रो रेल्वे प्रकल्प याच भागात उभारला जात आहे. नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पग्रस्तांना साडेबावीस टक्के योजनेंर्तगत ज्या ठिकाणी भूखंड देण्यात आले आहेत ते सर्व भूखंड पुष्पकनगरमध्ये देण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी सद्य:स्थिती केवळ जमिनीचा भराव टाकण्याचे काम सुरू असून पायाभूत सुविधांचा लवलेश नाही. त्यामुळे एक पूर्ण विकसित तर एक पूर्णपणे अविकसित नोड पनवेल महापालिकेत देण्यास सिडकोने नकार दिला आहे. तीन वर्षांपूर्वी राज्य शासनाने नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रातील (नैना) २७० गावाजवळील मोकळ्या जमिनींचा विकास करण्याचे काम सिडकोवर सोपविले आहे. त्यातील पनेवल तालुक्यातील ६० गावे पनवेल महापालिकेत दिली जाणार असल्याने सिडकोचे नैना क्षेत्र २१० गावांपुरते मर्यादित राहणार आहे.
अशी असेल जबाबदारी..
* नैना क्षेत्रात सिडकोला जमीन संपादित करण्याचा कोणताही अधिकार नसल्याने केवळ विकास आराखडा तयार करण्याचे काम आहे. सिडकोचे पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर उरलेसुरले अस्तित्व संपुष्टात येणार आहे.
* विमानतळ, मेट्रो आणि नैना विकास आराखडय़ाचे काम.
* प्रकल्पांचे विकासक सिडकोच्या अभियंता विभागाएवढेच सक्षम.
* शिल्लक भूखंड विकणे, ५५ हजार घरांची निर्मिती करणे, जमिनीचे मालक म्हणून कायम मक्तेदारी असल्याने हस्तांतरण शुल्क जमा करणे यांसारख्या कामांची जबाबदारी.
* २२०० कर्मचाऱ्यांची संख्या १३०० वर. नजीकच्या भविष्यात नोकरभरती नाही.