नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त कंत्राटदार आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवा उद्योजकांना नोंदणीकरण, कंत्राट गुणवत्ता इ. निविदा पद्धत आदीबाबत प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींची माहिती व्हावी, या उद्देशाने सिडकोतर्फे दोनदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्राच्या बिझनेस सेंटरमधील तळ मजल्यावरील समिती कक्षात २२ व २३ सप्टेंबरला सकाळी १० ते ५ या कालावधीत ही कार्यशाळा होईल.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रगतीसाठी सिडकोतर्फे विविध योजना राबविण्यात येतात, यात प्रामुख्याने प्रकल्पग्रस्त कंत्राटदार आणि उद्योजकांना ३ लाखांपर्यंतची ए-२ ची कामे कोटेशन पद्धतीने देण्यात येतात. या प्रकल्पग्रस्त कंत्राटदारांना निविदा प्रक्रियेत सहभागी होता यावे, प्रक्रियेची संपूर्ण माहिती समजावी. कंत्राटाच्या सर्व टप्प्यांवर पूर्ण करावयाच्या प्रशासकीय बाबींसंदर्भात अवगत करावे हा कार्यशाळेचा उद्देश आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन सिडकोच्या अभियांत्रिकी विभागाने केले आहे.