लोकसत्ता प्रतिनिधी
पनवेल: दिवाळीच्या मुहूर्तावर गुंतवणूकदारांसाठी सिडको महामंडळाने नवी मुंबईतील विविध उपनगरांमधील भूखंड विक्री योजनेची जाहीरात शुक्रवारी जाहीर झाली. इच्छुक गुंतवणूकदारांना २९ नोव्हेंबरपर्यंतची ऑनलाइन नोंदणीची अखेरची मुदत आहे. या योजनेमध्ये निवासी, बंगला, निवासी तथा वाणिज्य भूखंड लिलाव पद्धतीने गुंतवणूकदार भाडेपट्ट्याने खरेदी करू शकतील. घणसोली, वाशी, सानपाडा, नेरुळ, खारघर, नवीन पनवेल आणि कळंबोली येथील हे भूखंड असून जास्तीत जास्त सात हजार ते कमीतकमी दीडशे चौरस मीटर असे वेगवेगळे भूखंड या योजनेतून विक्री करता येतील.
सिडको मंडळाने ३६ भूखंडांच्या विक्री योजनेत सर्वाधिक दर नेरुळ येथील सेक्टर ४ मधील भूखंड क्रमांक २३ वर निवासी व वाणिज्य जागेचा जाहीर केला आहे. प्रति चौरस मीटरला पाच लाख २८ हजार एवढा दर जाहीर झाल्याने नवी मुंबईतील ही सर्वात उच्चांक लिलाव दर ठरणार आहे.
आणखी वाचा-सिडकोमध्ये १०० पदांची भरती; मंजूर पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना
या लिलाव पद्धतीमध्ये सर्वात कमी दर नवीन पनवेल येथील निवासी व वाणिज्य भूखंडासाठी सिडकोने जाहीर केला आहे. हा दर प्रतिचौरस मीटर ८७ हजार रुपये एवढा आहे. हे सर्व चढे दर असल्याने सिडको मंडळाने घोषित केलेले लिलावापूर्वीचे बाजारमूल्य अधिकचे असल्याने गुंतवणूकदार या लिलाव पद्धतीला आकर्षित होतील याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या लिलावामध्ये खारघर उपनगरातील सेक्टर १९ व २१ येथे बंगल्यांसाठी भूखंडांची लिलाव होणार आहे. तीनशे ते पाचशे चौरस मीटरच्या या बंगाल्यांसाठी सिडकोने घोषित केलेली लिलावाची प्रतिचौरस मीटरची रक्कम १ लाख १६ हजार ते १ लाख ३१ हजारांच्या पुढे आहे. त्यामुळे मुंबईतील सेकंड होम नवी मुंबईत घेणाऱ्या इच्छुक गुंतवणूकदारांसाठी सिडकोने उपलब्ध केलेली संधी असल्याची चर्चा आहे. शुक्रवारपासून सिडकोच्या संकेतस्थळावर या सोडतीची अधिक माहिती सिडको मंडळाने जाहीर केली आहे.