उरण: गुरुवारी सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने द्रोणागिरी नोड मधील बांधकामावर कारवाई केली. यामध्ये जेएनपीटी कामगार वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोरील टपऱ्या, दुकाने तसेच सेक्टर ४९ ते ५२ मधील हॉटेल्स, पदपथावरील दुकाने, टपऱ्या, कार्यालये आदींवर जेसीबी चालवीत ही बांधकामे हटविण्यात आली. त्यामुळे द्रोणागिरी नोड मधील पदपथ मोकळे झाले आहेत. प्रचंड फौजफाट्यासह ही कारवाई करण्यात आली. यावेळी सिडकोचे अधिकारी, सुरक्षा रक्षक, पोलीस व कर्मचारी यांचा समावेश होता.
सिडकोने ही कारवाई पावसाळ्यात केल्याने झोपडपट्टी धारक व व्यवसायिकांवर उघड्यावर संसार मांडण्याची वेळ आली आहे. यामध्ये द्रोणागिरी नोडच्या उरण- पनवेल मार्गावरील रस्त्याच्या शेजारील झोपडपट्ट्या, व्यवसायिकाच्या टपऱ्या वसल्या होत्या. या झोपड्या टपऱ्या हटविण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या संदर्भात सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाशी संपर्क केला असता प्रतिसाद दिला नाही.