लोकसत्ता टीम
उरण: शहरांचे शिल्पकार म्हणून बिरूद मिरवणाऱ्या सिडको विकसित करीत असलेल्या उरणच्या द्रोणागिरी नोड मधील नागरीकांची रस्ते, गटार सारख्या मूलभूत नागरी सुविधा विना परवड सुरू आहे. सिडकोच्या साडेबारा टक्के विकसित भूखंडावर द्रोणागिरी नोडच्या विकासाचे काम सुरू आहे. येथील सेक्टर ५१ व ५२ ला जोडणारच रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे सेक्टर ५२ मधील इमारती मधील हजारो नागरीकांना दोन ते तीन फूट पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. या स्थितीत वाहनांना अपघात होण्याची शक्यता आहे.
सिडकोच्या नवी मुंबई विकासाचा भाग असलेल्या उरण मध्ये सिडकोकडून द्रोणागिरी नोड विकसित केला जात आहे. मुंबई व नवी मुंबई सारख्या शहराच्या उप नगरच्या रूपाने उरणच्या विस्तार सुरू आहे. तर उरण परिसरात वाढते उद्योग आणि मुंबई शिवडी न्हावा शेवा पार बंदर,अलिबाग विरार कॉरिडॉर, नेरुळ ते उरण लोकल त्याचप्रमाणे उरण ते पळस्पे व नवी मुंबई हे दोन राष्ट्रीय महामार्ग आशा दळणवळणाच्या साधनात वाढ झाली आहे. या सुविधामुळे उरण शहरा लगतच विकसित होणाऱ्या या नागरी वस्तीत वाढ झाली आहे.
या नवीन शहरात राज्यातील विविध शहर व देशातील अनेक राज्यातील नागरीक वास्तव्य करीत आहेत. मात्र येथील वस्त्यांमध्ये नागरी सुविधांचा वाणवा जाणवू लागला आहे. त्यामुळे येथील नागरीकांची गैरसोय होऊ लागली आहे. या नागरीसुविधा पुरविण्याची जबाबदारी सिडकोची आहे. मात्र सिडको चे दूर्लक्ष होत असल्याने नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात सिडकोच्या द्रोणागिरी नोडचे कार्यकारी अभियंता हनुमंत नहाने यांनी द्रोणागिरी नोड मधील काही भागात कांदळवन असल्याने, सी आर झेड, वन विभाग यांच्या परवानग्या नसल्याने रस्त्या सारख्या नागरीसुविधा देण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यासाठी या विभागांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच मार्ग निघेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.