नवी मुंबई: कोपरखैरणेत उद्यानांची दुरवस्था ही नित्याचीच बाब झाली आहे. मात्र त्यातही काही उद्याने चांगली असून रोज प्रभात फेरीसाठी लोक येत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून चारी बाजूंनी सुरक्षित आणि सुरक्षा रक्षक असलेल्या उद्यानात श्वानांचा वावर वाढल्याने डोकेदुखी होत आहे. जॉगिंग करताना अनेकदा कुत्री मागे लागणे, जॉगिंग ट्रॅकवर घाण करणे, अचानक भुंकल्याने दचकणे असे प्रकार होत आहेत.
नवी मुंबईत उद्यानांच्या बाबतीत कोपरखैरणे नोड सर्वात कमनशिबी आहे. या ठिकाणी सिडकोने उद्यान आणि शेजारीच मैदान असे अनेक निर्माण केलेले आहेत. मात्र त्याची निगा मनपाने एखाद्या वर्षी सलग राखली असे एकही वर्ष नाही, असा दावा नेहमीच कोपरखैरणेवासीय करत असतात. याला अपवाद फक्त शांतिदूत महावीर उद्यान आणि निसर्ग उद्यान यातील शांतिदूत महावीर उद्यानात बाकडे खराब असले तरी जॉगिंगसाठी चांगली सोय आहे. तर निसर्ग उद्यान मुळात जॉगिंग याच उद्देशाने बनवण्यात आलेले असल्याने तेथेही उत्तम सोय आहे. पावसाळा व्यतिरिक्त दोन्हीकडे मोठ्या प्रमाणात जॉगिंग करणाऱ्यांची गर्दी असल्याने दोन्ही ठिकाणी ओपन जिम आहेत.
हेही वाचा >>>खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील हलगर्जीपणाबाबतच्या याचिकेची सूनावणी पुढील तारखेला
निसर्ग उद्यानात सध्या हिवाळा असल्याने लोकांची गर्दी वाढली आहे. मात्र आता इथे येणाऱ्या लोकांना गेल्या काही महिन्यांपासून मोकाट श्वानांचा त्रास होत आहे. त्यात दुर्दैवाने काही श्वानप्रेमी त्यांना बिस्किटे वैगरे पदार्थ देत असल्याने अशा मोकाट श्वानांची गर्दी वाढत आहे. जॉगिंग करताना हे श्वान मागे लागतात.त्यात सकाळी ज्येष्ठ नागरिकांची संख्याही लक्षणीय असते. ज्येष्ठ नागरिक वेगाने चालण्याचा व्यायाम करतात. त्यात अचानक एखादा श्वान भुंकल्याने हे ज्येष्ठ नागरिक दचकतात, अशी प्रतिक्रिया देवेंद्र लोढा यांनी दिली. कोपरखैरणे विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र प्रतिसाद मिळाला नाही.