पनवेल : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातील काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तळोजातील नागरिक प्रदूषणामुळे हैराण झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. वारंवार तक्रारी करुनही प्रदूषणाची समस्या सुटू शकलेली नाही. या पार्श्वभूमीवर इंडियन नॅशनल परिवर्तन पार्टीने राज्य आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना येथून हटविण्याची मागणी केली आहे.
तळोजा औद्योगिक परिसरातील वायू व जल प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) या दोन्ही मंडळांकडे नागरिकांनी वारंवार लेखी व तोंडी तक्रार करुनही मंडळांच्या अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिक त्रस्त असल्याचा आरोप इंडियन नॅशनल परिवर्तन पार्टीचे राजीव सिन्हा यांनी केला आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील उल्का कंपनी (शितगृह) आणि त्यासमोर असलेल्या इतर मासळी साठवणुकीची शितगृह तसेच तळोजा सीईटीपी प्रकल्प आणि रामकी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याने हा तळोजातील नागरिकांना श्वसनाचे विकार होत असल्याचा नागरिकांचा दावा आहे. सामाजिक कार्यकर्ते सिन्हा यांनी केलेल्या दाव्यानुसार प्रदूषणाच्या सुरुवातीला एमपीसीबीकडे तक्रारी केल्यानंतर एमपीसीबीचे सहाय्यक प्रादेशिक अधिकारी विक्रांत भालेराव यांनी काही प्रमाणात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, मात्र कालांतराने कंपन्यांच्या प्रभावाखाली जाऊन त्यांनी पूर्वीसारखेच प्रदूषण सुरू राहू दिले, असा सिन्हा यांनी आरोप केला आहे.
रहिवासी तक्रार करत असताना अधिकारी मात्र ‘हा धूर किंवा दुर्गंधी नसून धुके व बांधकामातील धूळ आहे’ असे चुकीचे कारण सांगून जबाबदारी टाळत असल्याचेही चित्र आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तळोजा फेज २ मध्ये तीन महिने राहून प्रत्यक्ष प्रदूषणाचा अनुभव घ्यावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे. तसेच सीपीसीबीच्या पुणे विभागाचे प्रादेशिक संचालक आणि एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांना सेवेतून हटवण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. या संदर्भात नागरिकांनी लोकायुक्तांकडे तसेच पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाकडे येथे तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र एमपीसीबीने या तक्रारी बंद करण्याचा प्रयत्न केला आणि प्रदूषण हटवण्याऐवजी केस मिटवण्यावर भर दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सिन्हा यांनी केला आहे.
रात्रीच्यावेळी तळोजा येथील ६ फीश मील (कोरडी पावडर बनविणाऱ्या) बंद ठेवण्याची कारवाई नोव्हेंबर ते मार्च अखेरपर्यंत रात्रीच्या वेळेस पूर्ण बंद करण्याची कारवाई मंडळाने केली आहे. तळोजातील ४ ब्रोमीन उत्पादन करणारे युनिट बंद आहेत. सॉल्व्हंट रिकव्हरी उत्पादन घेणाऱ्या कारखान्यांना कोणतेही उल्लंघन करुन नयेत, असे कडक निर्देश दिले आहेत. तळोजा सीईटीपी व्यवस्थित चालवावे यासाठी एमआयडीसीला वेळोवेळी निर्देश दिले आहेत. सध्या सीईटीपीतून प्रक्रियायुक्त शुद्धपाणी बाहेर जात आहे. नागरिकांमध्ये जनजागृती व सुसंवाद होण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. विक्रांत भालेराव, सहाय्यक प्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी