उरण : जुलैच्या मध्यावर उरण मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे उरणला पाणी पुरवठा करणारे रानसई धरण भरून वाहू लागल आहे.  मात्र मागील पंधरा दिवसापासून पावसाचा खंड पडल्याने उरणकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे उरणच्या रानसई धरणाची साठवणूक क्षमता जवळपास ४ दशलक्ष घन मीटरने कमी झाल्याने पाऊस सुरू राहिल्यास धरणातील पाणी साठा कायम राहण्यास मदत होते. मात्र पावसाचा खंड वाढल्यास पुढील पावसाळ्या पर्यंत पाणी पुरवठा करण्यात अडचण निर्माण होऊन उरणच्या नागरिकांना अधिकच्या पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेला जबाबदार कोण? राज ठाकरे यांचा सवाल

यावर्षी १८ जुलैला रानसई धरण काठोकाठ भरले आहे. त्यामुळे उरणकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मागील वर्षी रानसई १३ जुलै ला भरले होते. यावर्षी पाऊस उशिराने सुरू होऊन ही २०२२ च्या तुलनेत धरण भरण्यासाठी अधिकचा अवघ्या पाच दिवसाचा कालावधी लागला आहे. रानसई धरणातून उरण मधील औद्योगिक कारखान्यासह, येथील २५ पेक्षा अधिक ग्रामपंचायती व नगरपरिषद यांना पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र त्यासाठी लागणारा पाणीसाठा अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे एमआयडीसीला सिडकोच्या हेटवणे धरणातून येणारे उसणे पाणी घ्यावे लागत आहे. तर डिसेंबर किंवा जानेवारीतच आठवड्यातील दोन दिवसांची पाणी कपात ही करावी लागत आहे.

हेही वाचा >>> मिनी मंत्रालय कोकण भवन ; प्रवेश खाजगी गाड्यांना बंद ,मात्र अन्यत्र कोठेही सोय नाही ….

उरण मधील पाणी पुरवठ्यासाठी दररोज ४० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. तर धरणाची साठवणूक क्षमता ही १० दशलक्ष घन मीटर वरून ७ दशलक्ष घन मीटर वर आली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी कमी पडू लागला आहे. पावसाळ्यात नोव्हेंबर पर्यंत पाणी नियमितपणे पुरवता येते मात्र त्यानंतर पाणी कपात करावी लागत आहे. यामध्ये आठवड्यातील दोन ऐवजी तीन दिवसांच्या कपातीचा सामना उरणच्या नागरिकांना करावा लागला होता. उरण मध्ये ३ ऑगस्ट पासून सलग पंधरा दिवसांचा पावसात खंड पडला आहे. त्यामुळे उरणच्या नागरिकांना पाणी चिंतेत वाढ झाली आहे. पावसात खंड पडला असला तरी रानसई धरणाच्या पाणी पातळी कमी झालेली नसल्याने पाणी पुरवठा सुरळीत व नियमित सुरू असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे अभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens concern over water problem in uran due to lack of rain for last 15 days zws
Show comments