पनवेल : करंजाडे वसाहतीमध्ये घर घेतलेल्या नागरीकांमध्ये त्यांची फसवणूक झाल्याची भावना निर्माण होत आहे. सिडको महामंडळाने येथे खासगी विकासकांना इमारती बांधून रहिवाशांना राहण्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र दिले मात्र पाणी, वाहतूकीसाठी बस अशा सोयीसुविधा अद्याप या परिसरात पुरेशा न सुरू झाल्याने नागरिक वैतागले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रम सेवेची ७६ क्रमांकाची बससेवा पनवेल रेल्वेस्थानक ते करंजाडे या मार्गिकेवर धावते. मात्र या बसच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांची रात्रीच्यावेळी प्रचंड गर्दी पनवेल रेल्वेस्थानकाबाहेर दिसते. बसच्या अपुऱ्या सोय सोबत तीन आसनी रिक्षांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना ताटकळत रात्रीच्यावेळी बसची प्रतिक्षा करावी लागते. यामध्ये कामावरुन घरी परतणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठे आहे.
कळंबोली येथे राज्य परिवहन विभागाचे कार्यालय आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांचे परिवहनबाबतचे प्रश्न या कार्यालयातील वरिष्ठांनी सोडविण्यासाठी पाठपुरावा करायचा आहे. परंतू परिवहन विभागाच्या या प्रादेशिक कार्यालयातून फक्त वाहनांची नोंदणी, वाहनांचे थकीत कर जमा करणे यालाच प्राधान्य दिले जाते. प्रादेशिक परिवहन विभागाचे भरारी पथक फक्त क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहू अवजड वाहनांना पकडण्यासाठी तैनात असतात. कोणत्या मार्गिकेवर नवी मुंबई महापालिकेच्या किंवा राज्य परिवहन मंडळाच्या बसफेऱ्या वाढविण्यासाठी प्रवासी संघाचे प्रतिनिधी, एनएमएमएटी, एसटीचे अधिकारी यांची बैठक लावून कोणताही मार्ग आजपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून काढण्यात आलेला नाही. तीन आसनी रिक्षा या मार्गावर वाढविल्यास काही प्रमाणात रात्रीअपरात्री प्रवास करणाऱ्या नोकरदार प्रवासी महिलावर्गाला ताटकळत स्थानकाबाहेर रहावे लागते.
हेही वाचा…ग्रामीण पनवेलमध्ये महावितरण कंपनीचे वायरमेन जखमी
एनएमएमटीच्या साहेबांनी बसच्या फेऱ्या वाढविल्यास एनएमएमटी सुद्धा फायद्यात राहील. पाच वर्षांपूर्वीची प्रवासी संख्या आणि आजची यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सर्वांनाच दुचाकी खरेदी करुन वसाहत ते स्थानक प्रवास शक्य नसल्याने सरकारी माफक दरातील प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा असतो. त्यामुळे ही मागणी प्रवाशांकडून होत आहे. बस फेऱ्यांच्या वाढीसोबत उरण नाका येथील वाहतूक कोंडीमुळे बसला सेक्टर ६ पर्यंत पोहचण्यासाठी वेळ लागतो. त्यावर वाहतूक पोलीसांनी मार्ग काढणे गरजेचे आहे. – चंद्रकांत गुजर, अध्यक्ष, करंजाडे नोड फ्लॅट ओनर्स असोशिएशन