बांबू पुलाऐवजी लाकडी पुलाची उभारणी लवकरच
नवी मुंबई : खाडी किनारा आणि जैवविविधता यांची माहिती उपलब्ध होण्यासाठी ऐरोलीमध्ये किनारी आणि सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्र उभारण्यात आले आहे. पक्षीप्रेमींना बोटीने खाडीसफरीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता दिवसेंदिवस नवी मुंबईसह, ठाणे, मुंबईतील पर्यावरणप्रेमी, पर्यटकांचा या केंद्राकडे ओढा वाढत आहे. करोनाच्या अनुषंगाने बंद ठेवण्यात आलेले हे केंद्र फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. येथील जैवविविधता पाहण्यासाठी तसेच फ्लेिमगो पक्षी पाहण्यासाठी नागरिक पसंती देत आहेत.
खाडी किनाऱ्यांचे महत्त्व, जैवविविधतेची माहिती व किनाऱ्यांचे संरक्षण कसे करावे ही माहिती होण्यासाठी वन विभागाने या ठिकाणी या केंद्राची उभारणी केली आहे. या ठिकाणी खारफुटीची माहिती होण्यासाठी तसेच बोटीने आतमध्ये जाता न येणाऱ्या नागरिकांकरिता बांबूचा वॉक टेल म्हणजे पूल उभारण्यात आला आहे. नागरिक येथील खारफुटी वनस्पतीची माहिती करून घेऊ शकतात, प्रत्यक्षात ते पाहू शकतात तसेच ज्यांना बोटिंगने जाऊन फ्लेिमगो पक्षी पाहणे शक्य होत नाही त्यांना या ठिकाणाहून पक्षी निरीक्षण करण्याची सुविधा आहे. या केंद्राला आणि येथील जैविविधता पाहण्यासाठी नागरिकांचा कल वाढत आहे. त्यामुळे येथील बांबू पुलाऐवजी लवकरच कायमस्वरूपी लाकडी पूल उभारण्यात येणार आहे. अशी माहिती वनविभाग अधिकारी एन जे कोकरे यांनी दिली आहे.