उरण : धुतुममधील भूमिपुत्रांना इंडियन ऑईल कंपनीत रोजगार द्या या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारी उपोषण सुरू केले. कंपनी प्रशासन जोपर्यंत मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा निर्धार ग्रामपंचायत सरपंच सुचिता ठाकूर यांनी केला.

इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेड या धुतुम ग्रामपंचायत हद्दीतील कंपनीत स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीय कामगारांच्या भरती सुरू आहे. विरोधात स्थानिक भुमिपूत्र संतप्त झाले आहेत. धुतुममधील भुमिपुत्रांनी सोमवारपासून (२० नोव्हेंबर) धुतुम ग्रामपंचायतीच्या सुचिता ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू केले आहे. यात त्या स्वतःही उपोषण करीत आहेत. ग्रामस्थांनी आपल्या रोजगाराच्या हक्कासाठी धुतुम ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली उपोषण जाहीर केले आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : सुरक्षा रक्षक असलेल्या उद्यानात आत्महत्या  

उरण तालुक्यातील धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीत केंद्र सरकारच्या अखत्यारीतील इंडियन ऑईल टॅन्किंग हा तेल व रासायनिक द्रव्ये साठवण करणारा प्रकल्प आहे. २५ वर्षांपूर्वी ५७ एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी धुतुम गावातील सुमारे ८३ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत. मात्र प्रकल्पात अद्यापही केवळ २७ प्रकल्पग्रस्तांनाच नोकरीत सामावून घेतले आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : सीवूडस् येथील अंबिका सोसायटीत लागली आग, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील इंडियन ऑईल टॅन्किंग प्रकल्प खाजगीकरण करून अदानी यांच्या इंडियन ऑईल अदानी वेंचर्सने घेतला आहे. धुतुम गावात अनेक तरुण – तरुणी उच्चशिक्षित, पदवीधर आहेत. मात्र नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी परप्रांतीय कामगारांची भरती केली जात आहे. याबाबत प्रकल्प व्यवस्थापनाशी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. आस्थापनावर भरती करण्यात आलेल्या परप्रांतीय कामगारांना वगळून तत्काळ स्थानिक कामगारांची भरती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. स्थानिकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी न्याय हक्कासाठी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन पुकारले आहे.

Story img Loader