नवी मुंबई – नेरूळ सेक्टर ६ येथे बुधवारी रात्री आठ वाजता तुलशी भवन या चार मजली इमारतीतील एका विंगचा स्लॅब खालील दोन मजल्यावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक महिला व एक पुरुष ठार झाला आहे. तर २ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर तुलशी भवन ही इमारत खाली करण्यात आली असून ५ विंगचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. संपूर्ण इमारत खाली करण्यात आली असून इमारतीमधील अनेक नागरिक शेजारीच असणाऱ्या दर्शन दरबार येथे वास्तव्यास आहेत, तर अनेकांनी आपल्या नातेवाईकांकडे आश्रय घेतला असल्याची माहिती दर्शन दरबार येथे तात्पुरत्या स्वरुपात राहणाऱ्या नागरिकांनी दिली.
बुधवारी झालेल्या घटनेत याच इमारतीमधील बाबाजी शिंगाडे यांचा मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी शोभा शिंगाडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तसेच या घटनेत घरात दुरुस्तीचे काम करणाऱ्या एका कामगाराचा मृत्यू झाला असून एकावर उपचार सुरू आहेत. दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील नागरिक दर्शन दरबार येथे राहत असले तरी अनेकांचे लक्ष आपल्या घराकडे लागले आहे. अनेक वर्षांची पूंजी जमा करून बॅंकेचे कर्ज काढून कोणी येथे घर घेतले आहे तर कोणी येथे भाड्याने राहत होते. त्यामुळे अचानक कोसळलेल्या संकाटामुळे अनेकांचे दुःख वेगळे असून काहींना आपल्या हक्काच्या घरी जाण्याची ओढ आहे. तर अनेकांना डोळ्यासमोर घडलेल्या घटनेमुळे मनात भिती वाटत असून घरी जायचे कसे, असाही प्रश्न पडला आहे. दर्शन दरबार येथे सध्या २० जन राहत असून अनेकांची मानसिक स्थिती भिन्न असून डोक्यावरच घरचं संकटात आल्याने आता पुढे करायचे काय, असे अनेक प्रश्नही या नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या तात्पुरत्या स्वरुपात येथे राहत असलो तरी आता पुढे काय हा प्रश्न सतावत असल्याचे मत येथील दुर्घटनाग्रस्त नागरिकांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा – गडचिरोली : पाण्याच्या शोधात दोन वाघांचा गावात प्रवेश, गावकऱ्यांमध्ये दहशत, पहा व्हिडीओ
दुर्घटनाग्रस्त इमारतीत ६ महिन्यांपूर्वीच घर विकत घेतले आहे. घरासाठी लाखो रुपयांचे कर्ज काढले आहे. मालक व मुलगा कामाला जातात. सून व तिचे एक मुल असे आम्ही घरात राहतो. बुधवारी घटना घडली तेव्हा ९ वाजता सगळे घरातच होतो. अचानक मोठा आवाज आला. इमारत भूकंप झाल्यासारखी हदरली. रस्त्यावर अपघात झाला असेल म्हणून खिडकीकडे पळालो. आरडाओरडा झाला म्हणून सगळेच घराबाहेर पळालो. आमच्या शेजारच्या घरातीलच भाग खाली कोसळला होता. जीव मुठीत घेऊन खाली पळालो. घरात सगळे साहित्य तसेच ठेऊन पळालो. हक्काचे घर कर्ज काढून घेतले पण परत जायला भिती वाटते आहे. परत तिथे राहायचे की नाही अशी धास्ती वाटते. आमचे नशीब म्हणूनच आम्ही वाचलो. – जयश्री दिक्षित, स्थानिक रहिवाशी
दुर्घटना घडली त्यावेळी चारजण घरात होतो. तर ३ जन कामाला गेले होते. घडलेल्या घटनेमुळे मनात एक धास्ती निर्माण झाली आहे. घरात राहायचे कसे असा प्रश्न पडत आहे. काय करायचे सूचत नाही. आम्ही भाड्याने राहत असून आमचा सगळा संसारच इमारतीत अडकलेला आहे. अचानक संकट कोणावरही येऊ नये. – अनिता जाधव, स्थानिक रहिवाशी
हेही वाचा – “सध्या जे सुरू आहे ते फक्त सत्ताकारण”, नितीन गडकरी असं का म्हणाले?
नशीब म्हणूनच वाचलो..
सारसोळे येथील या इमारतीत ३ वर्षांपासून भाड्याने राहतो. पत्नीला डेंग्यू झाला म्हणून तेरणा रुग्णालयात ४ दिवस अॅडमिट केले होते. उपचार करून बुधवारी घटना घडली त्याच दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला म्हणून घटनेच्या आधी १५ मिनिटेच घरात आलो होतो. आमच्या बाजूच्या घरातीलच स्लॅब खाली कोसळला. मोठ्याने आवाज झाल्याने नुकतेच रुग्णालयातून आलेल्या पत्नीला व लहान मुलाला घेऊन जीव मुठीत घेऊन इमारतीबाहेर पडलो. – शशी भूषण सिन्हा, रहिवाशी