उरण : सिडकोकडे भूखंड आणि घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प असूनही कचऱ्याची समस्या कायम आहे. समस्या कमी न होता यात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे उरण मधील घनकचरा व्यवस्थापन कधी असा सवाल आता उरणच्या नागरिकांकडून केला जात आहे.उरण शहर आणि तालुक्याला कचराभूमी नसल्याने कचरा समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक मुख्य मार्ग कचऱ्याने ओसंडून वाहू लागले आहेत.
उरण तालुक्यातील अनेक गावात सांडपाणी व्यवस्थापन व कचरा व्यवस्थापनाच्या शून्य दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण भाग त्याचबरोबर नव्याने निर्माण होणारा शहरी परिसरही बकाल दिसत आहे. उरण तालुक्यातील जवळपास सर्वच गावातून गोळा केलेला कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकून या ग्रामपंचायतींनी रस्त्यांचे डंपिंग ग्राउंड केल्याची स्थिती आहे.या कचऱ्यामुळे नागरिकांसोबत मुक्या भटक्या प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कचऱ्याला दररोज आग लावली जात आहे. त्यामुळे प्रदूषणचा धोका ही वाढला आहे.
निसर्ग संपन्न डोंगर रांगांच्या गर्द हिरव्या छायेत वसलेला उरण तालुका हा मुंबई व नवी मुंबई शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. मात्र या तालुक्यात असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या नागरिकांचा श्वास कोंडला जात आहे. सध्या मोठ्या प्रमाणात केर कचरा हा चिरनेर,कोप्रोली, चिर्ले, दिघोडे,पिरवाडी- चारफाटा, नवघर, बोकडवीरा, द्रोणागिरी नोड,पाणदिवे, पिरकोन सारडे व वशेणी, चाणजे,नागाव अशा गावांतील रस्त्यांवर टाकला जात आहे. या कुजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरते. त्यामुळे या दुर्गंधीने साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
एकीकडे शासन स्वच्छ भारत अभियान राबवत आहे तर दुसरीकडे या अभियानाला हरताळ फासण्याचे काम उरण तालुक्यात होत आहे. अनेक गावात सांडपाणी व्यवस्थापन नसल्याने गावागावांतून सांडपाणी वाहत असल्याचे चित्र आहे. महसूल विभाग,पंचायत समिती प्रशासन सुद्धा ग्रामपंचायतींच्या या अस्वच्छ कारभाराला प्रतिबंध करीत नसल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे.
उरण मधील अनेक ग्रामपंचायतींनी सिडकोने घनकचरा प्रकल्प उभारणीसाठी भूखंड द्यावा अशी मागणी केली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. उरण तालुक्यातील कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे नियोजन करण्यासाठी पंचायत कडून पाहणी करून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती उरण पंचायत समिती कडून देण्यात आली आहे.दरम्यान, उरणच्या द्रोणागिरी सेक्टर ११ मधील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू आहे. तर जासई येथील प्रकल्प बंद असल्याची माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकार प्रिया रातांबे यांनी दिली आहे.
द्रोणागिरी, जासईतही कचरा समस्या
उरण तालुक्यातील निम्मा परिसर हा सिडकोच्या अखत्यारित आहे. येथील नागरिक सुविधा पुरविण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. द्रोणागिरी नोड मधील सेक्टर ११ आणि ३० मध्ये घनकचरा प्रक्रिया करण्यासाठी भूखंड आरक्षित ठेवण्यात आला आहे. तर जासई येथे सिडकोचा घनकचरा प्रकल्प गेली अनेक वर्षे बंद पडला आहे. त्यामुळे या परिसरातील कचऱ्याच्या समस्येत वाढ झाली आहे. हा प्रकल्प सुरू करण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.