महाराष्ट्र शासनाच्यावतीने २००२-०३ पासून संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान राबवले जात असून राज्यात मागील अनेक वर्षे सातत्याने स्वच्छतेमध्ये नेहमीच नवी मुंबई शहर सर्वप्रथम क्रमांकावर राहीले आहे. २०२२ मध्ये केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र राज्यात अव्वल आणि देशात तृतीय क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबई शहर मानांकित आहे. एकीकडे देशात सातत्याने गौरवल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहर व महापालिकेच्या कामाचे सातत्याने कौतुक केले जाते. तत्कालिन आयुक्त अभिजीत बांगर यांच्यानंतर आयुक्त राजेश नार्वेकर यांना यंदा राज्यात पहिला व देशात ३ रा क्रमांक टिकवून ठेवणे किंवा दुसऱ्या वरच्या क्रमांक पटकावणे आव्हानात्मक आहे. एकीकडे नवी मुंबई शहरातील स्वच्छतेमुळे एकंदारीतच शहर स्वच्छ असले तरी शहरातील दिघा ते बेलापूरपर्यंत शहरातील विविध चौक, वाहतूक बेट असलेल्या ठिकाणी शहराचे सौदर्य वाढवणारी व लक्षवेधक ठरणारी शिल्पे मात्र धुळीने माखलेली आहेत. त्यामुळे याबाबातही पालिकेने योग्य ती खबरदारी घेण्याची व शिल्पांची स्वच्छताही ठेवण्याची आवश्यकता आहे.
नवी मुंबई हागणदारी मुक्त शहरांच्या ओडीएफ कॅटेगरीत नवी मुंबई देशातील सर्वोच्च ‘वॉटर प्लस’ मानांकित शहर आहे. त्याचप्रमाणे कचरामुक्त शहराच्या कॅटेगरीत नवी मुंबई हे राज्यातील एकमेव ‘फाईव्ह स्टार’ मानांकित शहर आहे. केंद्र सरकारने आयोजित केलेल्या ‘इंडियन स्वच्छता लीग’मध्ये राष्ट्रीय स्तरावरील १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये सर्वोत्तम युवक सहभागाचा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार नवी मुंबईस प्राप्त झालेला आहे. याशिवाय इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत आयोजित केलेल्या तीन उपक्रमांची विक्रमी नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ मध्ये झालेली आहे.
हेही वाचा – नवी मुंबई: माथाडी कामगारांचा अपेक्षा भंग,संपाचा इशारा
राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ यामध्येही नवी मुंबईस राज्यातील प्रथम क्रमांकाच्या पर्यावरणशील शहराचा बहुमान लाभलेला आहे. तसेच इंडियन रेटिंग अँड रिसर्च या राष्ट्रीय स्तरावरील अर्थविषयक मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने ‘इंडिया डबल ए प्लस स्टेबल’ हे सर्वोत्तम आर्थिक पतमानांकन सतत आठ वर्षे नवी मुंबईने कायम राखले आहे. अशाप्रकारे आर्थिक सक्षमतेचे मानांकन संपादन करणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे.
नवी मुंबईच्या स्वच्छतेचे व सुशोभिकरणाचे मुंबई व इतर शहरातही अनुकरण ठिकठिकाणी केले जात आहे. सुरवातीला आयुक्त बांगर यांच्या बदलीनंतर नव्याने सुरू झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई महापालिका स्वच्छता कर्मी, तसेच अधिकारी ढेपाळल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.परंतु, पुन्हा एकदा वेगाने स्वच्छतेबाबत व सुशोभीकरणाबाबत काम चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने आपल्या कामाची गुणवत्ता उंचावण्याचा प्रयत्न करीत असून हा पुरस्कार म्हणजे स्वच्छता व सुशोभिकरणातील वैशिष्ट्यपूर्ण कामांची पोचपावती असून अधिक जोमाने पालिकेने स्वच्छतेला सुरवात केली आहे.
हेही वाचा – पनवेल: तळोजातील कारखान्याला आग
नवी मुंबई शहरात ऐरोली येथील दिवा कोळीवाडा चौकापासून ते अगदी बेलापूर येथील शीव पनवेल महामार्गानजिक असलेल्या बेलापूर येथील वाहतूक पोलीस चौकीपर्यंत शहरात अनेक आकर्षक शिल्प साकारण्यात आलेली आहेत. शहराअंतर्गत शिल्पांबरोबरच पामबीच मार्गावरही विविध चौकांत शिल्प साकारलेली आहेत. परंतु, शहराचे सौंदर्य वाढवणारी बहुतांश शिल्प धुळीने माखलेली आहेत. त्यामुळे शिल्पांच्या स्वच्छतेबाबतही महापालिकेने योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
नवी मुंबई शहराजवळच सुरू असलेले नवी मुंबई विमानतळाचे काम, तसेच नवी मुंबई शहरात सुरू झालेल्या पुनर्विकासाच्या खोदकामांमुळे शहरातील धुलीकणांचे प्रमाण जास्त असून शिल्पांच्या स्वच्छतेबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येईल, असे शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितले.