नवी मुंबई : ‘निश्चय केला नंबर पहिला’ हे घोषवाक्य सिद्ध करण्यासाठी नवी मुंबई पालिकेच्या वतीने शेकडो नागरी कामे, रंगरंगोटी, सुशोभीकरण करण्यात येत असून ही सर्व कामे विविध कंत्राटदारांकडून करून घेतल्यानंतर आता निविदेचा फार्स पूर्ण केला जात असल्याचे निर्देशनास आले आहे. विशेष म्हणजे ही सर्व कामे प्रत्येक प्रभागातील माजी नगरसेवक, बाहुबली राजकीय कार्यकर्ते, माहिती कार्यकर्ते यांना खिरापत म्हणून वाटण्यात आलेली आहेत. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या माजी नगरसेवकांनी तर प्रभागातील ही कामे आपल्याला आंदण दिल्यासारखे व्यवहार केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई पालिका क्षेत्रात छोटीमोठी एक हजार ९०० नागरी कामे सुरू आहेत. करोनाच्या काळात मोठय़ा खर्चाच्या नागरी कामांना राज्य शासनाने कात्री लावली होती. त्यामुळे ही कामे वगळता गेली तीन वर्षे सुरू असलेल्या साडेसहा हजार छोटय़ामोठय़ा कामांतील आता जवळपास दोन हजार नागरी कामे सुरू आहेत. करोनाकाळात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत विनानिविदा आरोग्य कामे देण्याचे अधिकार आयुक्तांना होते. त्या अधिकारांतर्गत करोनाच्या तीन लाटांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुमारे चारशे कोटींपेक्षा जास्त खर्चाची कामे देण्यात आलेली आहेत. याशिवाय करोनाची साथ ओसरल्यानंतर काही नागरी कामे सुरू करण्यात आलेली असून यात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छताविषयक शौचालय, सुशोभीकरण, भिंतिचित्र, नवीन स्वच्छताविषयक प्रकल्प, मजूर यांसारख्या अनेक कामांवर सुमारे ४६ कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. याशिवाय शहराला फ्लेिमगो सिटीची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी निर्जीव फ्लेिमगोचे दीड हजारांपेक्षा जास्त शिल्पाकृती लावण्यात आलेल्या आहेत. कमीत कमी सहा हजार ते जास्तीत जास्त १९ हजार रुपये किमतीच्या या फ्लेिमगो शिल्पाकृतीवर पर्यावरणप्रेमींनी टीका केली आहे. नवी मुंबईच्या खाडीकिनारी दरवर्षी येणाऱ्या हजारो जिवंत फ्लेिमगोचा अधिवास टिकवण्यासाठी पालिकेने प्रयत्न करण्याची आवश्यकता असताना पालिका काही महिने टिकणाऱ्या लोखंडी, माती आणि ब्रांझच्या फ्लेमिंगो कलाकृती उभारण्यावर लाखो रुपये खर्च करीत आहे. या फ्लेमिंगोच्या अति दिखाव्याबरोबरच नवी मुंबई पालिकेने शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुशोभीकरण, वाहतूक बेट, विद्युत रोषणाई, रंगरंगोटी ही कामे अगोदर पूर्ण केली असून या कामाच्या निविदा काढण्याचे सोपस्कार आता पार पाडले जात आहेत.

केंद्र सरकारचे स्वच्छ भारत अभियानाचे निरीक्षण पथक कोणत्याही दिवशी अचानक नवी मुंबईत येणार आहे. त्यासाठी पालिकेने मागील काही महिने शेकडो कामे शहरात ठिकठिकाणी पूर्ण केलेली आहेत. या कामांच्या

निविदा नुकत्याच प्रसिद्ध

केलेल्या आहेत. नेरुळ विभागात काम अगोदर आणि निविदा नंतर अशी वीसेक प्रकरणे निर्देशनास आलेली आहेत. नवी मुंबई पालिका क्षेत्रात एकूण आठ विभाग असून प्रत्येक विभागात अशा प्रकारे काम अगोदर निविदा नंतर ही पद्धत अंगीकरणात आलेली आहे.

विशेष म्हणजे पालिकेत आता नगरसेवकांची सत्ता नाही. गेली दोन वर्षे पालिकेवर आयुक्त हेच प्रशासक म्हणून काम पाहात आहेत. मात्र गेली अनेक वर्षे नगरसेवकांच्या हातातील बाहुले झालेले स्थानिक अधिकारी हे त्या आजीमाजी नगरसेवकांच्या इशाऱ्यावर काम देत आहेत. ही कामे तकलादू असल्याचेही बाब पुढे आली आहे. 

प्रशासन गोत्यात?

नगरसेवकाचे कार्यकर्ते या पात्रतेखाली ही कामे देण्यात आली असून अनेक ठिकाणी त्याचे तीनतेरा वाजले आहेत. तरीही या कामाची लाखो रुपयांची बिले पालिका अदा करणार आहे. त्यामुळे पालिकेच्या या ‘निश्चय केला नंबर पहिला’ हे घोषवाक्य पूर्ण करण्यासाठी काम आधी, निविदा नंतर धोरणामुळे पालिकेचा अभियंता व घनकचरा विभाग चांगलाच गोत्यात येणार असल्याचे दिसून येते.