उरण : खारकोपर ते उरणदरम्यानच्या लोकल मार्गावरील रेल्वे स्थानकांत साफसफाईसह देखभालीची जबाबदारी सिडकोची की रेल्वेची या संदर्भात दोन्ही विभागांची टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे स्थानिक सफाई कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत असून वाढत्या गैरसोयीमुळे रेल्वे प्रवासी त्रस्त झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खारकोपर-उरण रेल्वे मार्गाचे उद्घाटन १२ जानेवारीला झाले आहे. त्यानंतर मागील आठ महिन्यांनंतरही सफाई व इतर कामे ठप्प आहेत. या संदर्भात रेल्वे विभागाने उद्घाटनानंतर अनेक पत्रे लिहून रेल्वे व सिडको यांच्यातील करारानुसार सिडकोने सफाई व इतर कामे करण्याची मागणी केली आहे. मात्र सिडकोने रेल्वेकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : महापालिका शाळांमध्ये मदतनीसांची कमतरता; सखी सावित्री समितीचा अहवाल देण्याचे निर्देश

उरणला जोडणाऱ्या या रेल्वे स्थानकांत सफाईसह इतर कामे स्थानिक कामगार करीत होते. यामध्ये बोकडवीरा, कोटनाका, नवघर, धुतुम व कुंडेगाव या गावांतील कामगार आहेत. मात्र सध्या हे काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या कामगारांना काम द्या या मागणीसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने सिडको व मध्य रेल्वे प्रशासनाला अर्ज-विनंत्या करून तसेच भेट देऊनही दखल घेतलेली नाही. त्यामुळे या दोन्ही प्रशासनांच्या विरोधात स्थानिक कामगारांनी जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याशीही पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : पोक्सोअंतर्गत दोन दिवसांत चार गुन्हे

या मागणीसंदर्भात मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, उरणचे तहसीलदार आदींना निवेदने देण्यात आली आहेत. सिडको आणि रेल्वेने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून ही स्थानके उभारली आहेत. त्यामुळे प्रथम प्राधान्याने या स्थानकांत येथील स्थानिकांना रोजगार मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. रेल्वे प्रकल्पबधितांना रोजगार मिळावा यासाठी येथील ग्रामस्थांनी वारंवार आंदोलने केली आहेत.