नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ओला, सुका व घरगुती घातक अशा ३ प्रकारे कचऱ्याचे निर्मितीच्याच ठिकाणी म्हणजे आपल्या घरापासूनच वर्गीकरण होणे गरजेचे आहे. कचरा वर्गीकरणाचे महत्व नागरिकांपर्यंत पोचावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अशाच प्रकारे स्वच्छतेविषयी सहजपणे जनजागृती करणारा ‘चालता बोलता स्वच्छता’ हा अभिनव उपक्रम कोपरखैरणे विभागात १ फेब्रुवारीपासून राबविण्यास सुरुवात झाली असून नवी मुंबई महानगरपालिका आणि शेल्टर असोसिएट्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे.
या उपक्रमांतर्गत रेल्वे स्थानक, बाजारपेठ, उद्याने, शाळा – महाविद्यालय परिसर अशा वर्दळीच्या ठिकाणी सायं ५ ते ७ या वेळेत महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी, कर्मचारी तसेच शेल्टर असोसिएट्सचे प्रतिनिधी असा ६ ते ७ जणांचा समूह नागरिकांशी थेट संवाद साधत आहे. यामध्ये सुरुवातीला जनजागृती करून माहिती दिली जाते. तसेच त्यानंतर उपस्थितांना स्वच्छतेविषयी सहज प्रश्न विचारून त्यांना स्वच्छता साहित्य स्वरुपात आकर्षक बक्षिसे दिली जात आहेत. अशाच प्रकारे वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधून त्यांना स्वच्छतेविषयी प्रश्न विचारून योग्य उत्तरे देणाऱ्या नागरिकांनाही बक्षिसे देऊन प्रोत्साहित केले जात आहे. ‘चालता बोलता स्वच्छता’ हा स्वच्छतेविषयी माहिती देणारा व नागरिकांना प्रोत्साहित करणारा आगळावेगळा उपक्रम नागरिकांच्या पसंतीस पडला असून सर्वच ठिकाणी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छत्याविषयी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून अशाच प्रकारचा अभिनव उपक्रम ‘चालता बोलता स्वच्छता’ हा नागरिकांशी थेट संवाद साधणारा व त्यांना स्वच्छतेविषयी सोपे प्रश्न विचारून त्यांनी योग्य माहिती सांगितल्यानंतर त्यांना बक्षिस देऊन प्रोत्साहित करणारा आहे.