स्व्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये नवी मुंबई शहरास नुकतेच राष्ट्रपती महोदयांच्या शुभहस्ते ‘देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा राष्ट्रीय बहुमान प्राप्त झाला महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून स्वच्छ सर्वेक्षण २०२३ ला ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हेच ध्येयवाक्य नजरेसमोर ठेवून शहरात प्रारंभ झाला आहे.
नवी मुंबई महापालिकेचा देशाच्या प्रथम नागरिक असणा-या राष्ट्रपती महोदयांच्या शुभहस्ते शहराचा गौरव होणे ही प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. परंतू एकीकडे नागरीकांच्या स्वच्छतेबाबतच्या अपेक्षा वाढत चालल्या असून स्वच्छतेबाबत पालिका साफसफाई कर्मचारी, उद्यान विभाग तसेच संपूर्ण नवी मुंबई नागरीकांच्या समुह प्रयत्नातून स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतू मागील काही दिवसापासून सातत्याने वर्दळीचे असलेले व मुख्य रस्ते यांची शहरात चांगली साफसफाई होत असताना शहराअंतर्गत रस्त्याच्या स्वच्छतेकडेही पालिकेने अतिशय बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. घनकचरा विभागाच्या साफसफाई कर्मचाऱ्यांमार्फत शहरात साफसफाई केली जात असताना मुख्य व नागरीकांच्या सातत्याने वर्दळ असलेले रस्ते मात्र चकाचक व स्वच्छ असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी अंतर्गत रस्त्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.नवी मुंबई पालिकाक्षेत्रात शहर व गावठाण असे भाग आहेत. गावठाण अर्थात नवी मुंबईतील मूळ गावठाणांमध्येही साफसफाई कर्मचारी चांगले काम करत असून शहरात असलेल्या अंतर्गत रस्त्यावर मात्र अनेकवेळा पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेने शहरातील मुख्य रस्त्याबरोबरच अतर्गत व सातत्याने वर्दळ नसलेल्या तसेच शहरातील उद्यानांच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर मात्र स्वच्छता पाहायला मिळत नाही.त्यामुळे पालिकेच्या स्वच्छता विभाग व उद्यान विभागाने याबाबत योग्य ती खबरदारी घेऊन शहर अधिक स्वच्छ सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहीजे.
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये देशभरातील ४३६० शहरे सहभागी झाली होती. त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान पटकावला. त्याचप्रमाणे कचरामुक्त शहराचे ‘फाईव्ह स्टार रेटींग’ प्राप्त करणारे नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. तसेच हागणदारीमुक्त शहरांच्या श्रेणीतील (ओडीएफ) ‘वॉटरप्लस’ हे सर्वोच्च मानांकन मिळविणारेही महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. त्यामुळे पालिकेने आपल्या नावलौकीकाला शोभेल अशा पध्दतीने शहर अधिक स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केला पाहीजे.नवी मुंबईतील नेरुळ व बेलापूर या विभागात सर्वात जास्त उद्याने आहेत.परंतू याच उद्यानांच्या ठिकाणी स्वच्छता व उद्यानाबाहेरील बाजूस पदपथावर कचरा अशी स्थिती याबाबत पालिकेने खबरदारी घेतली पाहीजे.
शहरात सातत्याने स्वच्छतेबाबत पालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबरच नागरीकांचेही स्वच्छतेत मोलाचे सहकार्य असते. परंतू शहरात मुख्य रस्त्यावर स्वच्छता परंतू अंतर्गत रस्त्यावर अस्वच्छता असल्याने पालिकेने याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
शहरात वर्दळीचे स्वच्छ व अंतर्गत रस्ते मात्र अस्वच्छ राहत असल्यास याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात येईल. अंतर्गत रस्ते अस्वच्छतेबाबत पालिका उद्यान कर्मचारी तसेच माळी यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात येतील.-राजेंद्र सानावणे, मुख्य स्वच्छता अधिकारी , नवी मुंबई महापालिका