पनवेल : पनवेल महापालिका परिसरातील पनवेल शहर, कळंबोली, खारघर, कामोठे, नवीन पनवेल या उपनगरांमध्ये तसेच शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचा परिसर आणि बेलापूर येथील सिडको भवनाचा परिसर स्वच्छता मोहिमेमुळे उजळून निघाला होता. सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांपासून सामान्य नागरीक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या राष्ट्रीय स्वच्छता मोहिमेमध्ये एक मनाने सहभागी होऊन स्वच्छता केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक तारीख एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान या ब्रिदवाक्याखाली ही मोहीम राबविण्यात आली. या श्रमदान मोहिमेत १३०० श्री दास भक्तांचे विशेष कार्य लक्षवेधक ठरले. दासभक्तांनी ७ मेट्रीक टन ओला कचरा जमा केल्याची माहिती माजी विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी दिली. पनवेल महापालिका परिसरात पालिकेने १४८ ठिकाणी ही मोहीम आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली. या मोहिमेमध्ये भाजपाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी हातामध्ये झाडू घेऊन शहरातील रस्त्यांचा परिसर स्वच्छ केला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह माजी नगरसेवक नितीन पाटील व इतर माजी नगरसेवकांनी सहभाग घेतला.

हेही वाचा – रेल्वे प्रशासनाला आधुनिकतेची गरज 

पालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार या मोहिमेमध्ये ३७ मेट्रीक टन कचरा जमा झाला. दररोज पनवेल महापालिकेच्या सफाई विभागाचे कर्मचारी अडीचशे मेट्रीक टन कचरा गोळा करुन घोट येथील नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे पाठवितात. कामोठे उपनगरातील कामोठे कॉलनी फोरम, सीटीझन युनिटी फोरम, मॉर्निंग वॉक ग्रुप, श्री सदस्य, अल्ट्रास्टीक फाऊंडेशन अशा विविध सामाजिक संस्थांमधील कार्यकर्त्यांचे हात स्वच्छतेसाठी सरसावले होते. सिडको भवन येथे सुट्टीचा रविवार असताना सिडको मंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भवनाचा परिसर स्वच्छ केला. रविवारी सकाळी १० वाजल्यापासून एक तास स्वच्छता करुन देशभरात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत पनवेल व नवी मुंबईचा सहभाग नोंदविला.

हेही वाचा – नवी मुंबई : स्वच्छता मोहिमेत पोलीस विभागाने नोंदवला उत्स्फूर्त सहभाग

श्री दास भक्तांनी हाती घेतलेली स्वच्छता मोहीम पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी व ग्रामीण भागात राबविण्यात आली. सिडको भवनामधील स्वच्छता मोहिमेमध्ये मुख्य अभियंता, व्यवस्थापक (कार्मिक), मुख्य आरोग्य अधिकारी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मुख्य लेखा अधिकारी तसेच सर्व विभाग प्रमुख, अधिकारी वर्ग, सि. ए युनियन, सि. इंजिनिअरिंग असोसिएशन, प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेयर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याचे कामगार संघटनेचे पदाधिकारी जे. टी. पाटील यांनी सांगितले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cleanliness drive in panvel area sub district hospital and cidco bhawan ssb