रस्ते, वीज, पाणी व प्रदूषणाचीही समस्या गंभीर
कळंबोली परिसराचा विकास झाला असला, तरी येथील रहिवासी काही मूलभूत सुविधांपासून अद्याप वंचित आहेत. स्वच्छतेच्या सुविधांचा अभाव ही यातील सर्वात गंभीर समस्या आहे. प्रभाग १०मधील कातकर वाडीत अनेकांच्या घरात अद्याप शौचालय सुरू झालेले नाही. त्यामुळे तेथील रहिवाशांना सार्वजनकि शौचालयाचा वापर करावा लागतो. रस्ते, वीज, पाणी व प्रदूषण या समस्याही गंभीर आहेत.
कळंबोली गवालगतच कातकरवाडी ही आदिवासी वस्ती आहे. ही वस्ती विविध सरकारी योजनांपासून अद्याप वंचित आहे. शासकीय अनुदानातून प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी योजना राबविण्यात आल्या आहेत. कातकर वाडीकडे ग्रामपंचायतीने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. प्रत्येक ग्रामपंचयतीने घरकूल योजने अंतर्गत आदिवासींना आणि गरजूंना घरे बांधून दिली आहेत. मात्र या प्रभागात ही योजना राबवण्यात आलेली नाही. बहुतेक घरे मोडकळीस आली आहेत. ग्रामपंचायतीने ज्या योजना राबविल्या नाहीत, त्या पनवेल महानगरपालिकने राबवाव्यात अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत.
प्रभागातील एल. आय. जी. परिसरातील मध्यमवर्गीयांच्या बैठय़ा घरांना आता उंच माडीचे रूप आलेले आहे. सिडको प्रशासनाने बेकायदा बांधकामांना प्रोत्सान दिले आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. येथील बांधकामांच्या गर्दीचा विचार करता, आग किंवा अन्य आपत्ती ओढावल्यास अग्निशमन बंब किंवा रुग्णवाहिका आत जाऊन बचावकार्य करू शकेल, अशी कोणतीही सोय येथे नाही.
प्रभागात माथाडी कामगारांची संख्या मोठी आहे. पोलाद बाजारात राबणारे माथाडी कामगार उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहत आहेत. हे स्वप्न पूर्ण व्हावे आणि मूलभूत समस्या नव्या लोकप्रतिनिधींनी सोडवाव्यात, अशी येथील मतदारांची अपेक्षा आहे. प्रभागात लहान मुलांना खेळता येईल, असे एकही उद्यान नाही.
कचऱ्याचा विळखा
सिडको वसाहतीत कचऱ्याची समस्या कायम आहे. या प्रभागातील सेक्टर १, २, ३मधून कळंबोली शहरात प्रवेश होतो. मात्र या विभागत अनेक ठिकाणी कचरा रस्त्यावर पडलेला असतो. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात दरुगधी आणि अस्वच्छता पसरली आहे. येथील कचरा वेळच्या वेळी उचला जात नाही, अशी येथील रहिवाशांची तक्रार आहे.
पदपथांवर गॅरेजचे अतिक्रमण
कळंबोली शहरात ठिकठिकाणी फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यात भर म्हणून प्रभाग – १० मधील पदपथांवर गॅरेज सुरू करण्यात आली आहेत. खुल्या केशकर्तनालयांनीही अनेक पदपथ अडवले आहेत. पदपथांवर चालण्यासाठी जागाच शिल्लक न राहिल्यामुळे पादचारी रस्त्यांवरून ये-जा करतात. त्यामुळे अपघात घडतात आणि वाहतूककोंडीतही भर पडते.
प्रभागक्षेत्र :
कळंबोली गाव, कातकर वाडी, सिडको, सेक्टर १, १इ, से २, २ ई, से.३, ३ई.