नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार या माथाडी कामगारांच्या शिखर संघटनेमार्फत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त वाशीतील बाजार समिती आवारात घेण्यात आलेल्या माथाडी मेळाव्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी फिरवलेली पाठ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने सातारा, सांगली, सोलापूर या पट्ट्यातील मूळ भूमिपुत्र असलेले हजारो माथाडी कामगार मुंबई महानगर पट्ट्यात स्थायिक झाले आहेत. दरवर्षी अण्णासाहेबांच्या जयंतीनिमित्त वाशीत भरणाऱ्या मेळाव्यात माथाडी संघटना आणि या संघटनेशी संलग्न असलेले नेते जोरदार शक्तिप्रदर्शन करत असतात. मात्र सलग दुसऱ्या वर्षी या मेळाव्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या पक्षाच्या मंत्री, आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने नवी मुंबईकेंद्रित माथाडीबहुल राजकारणाला मुख्यमंत्र्यांनी बगल दिल्याची चर्चा आता रंगली आहे.

हे ही वाचा…नवी मुंबई :वेश्या व्यवसायातील दलालावर कारवाई चार महिलांची सुटका, एका अल्पवयीन मुलीचा समावेश

मुंबईतील कृषी मालाच्या बाजारपेठा नवी मुंबईत स्थिरावताच तेथील बहुसंख्य व्यापारी आणि माथाडी कामगार हा नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये स्थिरावला. पश्चिम महाराष्ट्रातील आणि विशेषत: सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांतून विखुरलेला हा कामगार एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यातही शरद पवार यांचा निष्ठावान मानला जात असे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या संघटनेच्या माध्यमातून वाशी बाजारपेठांमधून कार्यरत असलेल्या या कामगारांच्या भेटीसाठी पवार राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन नियमितपणे वाशी येथील बाजारांमध्ये येत असत. या संघटनेच्या माध्यमातून दिवंगत शिवाजीराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्यासह राजकीय क्षेत्रातील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची एक मोठी फौज पवारांनी उभी केली होती.

नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा क्षेत्रांत हा कामगार मोठ्या संख्येने आहे. ऐरोली विधानसभा क्षेत्रात माथाडी वस्त्यांमधून निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्याही मोठी आहे. या भागातील बडे नेते गणेश नाईक यांनी मोठ्या चलाखीने यापैकी बहुसंख्य माजी नगरसेवकांना नेहमीच राजकीय बळ दिले. राज्यातील राजकीय गणित बदलल्यानंतर नवी मुंबईतील या माथाडी राजकारणानेही कुस बदलली असून सलग दुसऱ्या वर्षी या मेळाव्याकडे राज्यातील शीर्षस्थ नेत्यांनी पाठ फिरविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हे ही वाचा…उमेदवारीसाठी शेकाप-ठाकरे गटात चुरस; उरण विधानसभा क्षेत्रात इच्छुक उमेदवारांचा प्रचार सुरू, काँग्रेसचाही दावा

मूळचे सातारा जिल्ह्यातील असलेले मुख्यमंत्री या मेळाव्यास येतील अशी माथाडी नेत्यांना आशा होती. असे असताना यंदाही मुख्यमंत्र्यांसह पक्षाच्या सर्वच नेत्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली. सातारा जिल्ह्याचे शिंदे गटाचे नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांचीही अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. मराठा बहुसंख्येने असलेल्या माथाडी कामगारांच्या या मेळाव्यास देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते मात्र मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनीही या मेळाव्याकडे पाठ फिरविल्याने माथाडी संघटनेतून ठरावीक राजकीय पक्षाला दिले जाणारे बळ शिंदे गटाला मान्य नसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

नवी मुंबईकेंद्रित माथाडी राजकारणाला बगल देऊन मराठा आणि माथाडीबहुल राजकारणाची नवी आखणी करण्याचे मत शिंदे गटातील काही नेते खासगीत व्यक्त करू लागले असल्याचे बोलले जाते.

हे ही वाचा…पामबीचवर मुलाच्या मृतदेहाजवळ पालकांचा आक्रोश, वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका पोहोचण्यास विलंब

शिंदे गटाची अनुपस्थिती चर्चेत

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या संघटनेत भाजपनिष्ठांचा प्रभाव वाढू लागला असून स्वर्गीय अण्णासाहेबांचे धाकटे पुत्र नरेंद्र पाटील यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ धरल्याने पवारनिष्ठांच्या या समूहात फूट पडल्याचे पाहायला मिळाले. साताऱ्यातील कोपरगाव विधानसभेचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर तर नरेंद्र पाटील गट येथे आणखी सक्रिय झाल्याचे दिसले. दरम्यान पाटील यांच्यामुळे गेल्या काही वर्षांपासून माथाडी मेळाव्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती येथे नियमित दिसू लागली आहे. असे असताना सलग दुसऱ्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माथाडी कामगारांच्या या मोठ्या मेळाव्याकडे पाठ फिरविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

स्वर्गीय अण्णासाहेबांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित माथाडी कामगारांच्या मेळाव्यास उपस्थित राहण्याची पूर्ण इच्छा होती. मात्र काल रात्रीपासून मला ताप भरल्याने या मेळाव्यास उपस्थित राहणे शक्य होऊ शकले नाही. मुख्यमंत्र्यांनाही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे या मेळाव्यास येता आले नसले तरी कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आम्ही सगळे सदैव सक्रिय आहोत. – नरेश म्हस्के, खासदार, शिवसेना

हे ही वाचा…ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सूखोई विमानाची चाचणी

या मेळाव्याचे रीतसर निमंत्रण मुख्यमंत्री तसेच स्थानिक नेत्यांना दिले होते. स्वर्गीय अण्णासाहेबांच्या जयंतीनिमित्त होणारा हा मेळावा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसतो. त्यामुळे अण्णासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या कुणीही या मेळाव्यास येऊ शकतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि हे सरकार कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच सकारात्मक राहिले आहे. – नरेंद्र पाटील, अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ