नवी मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नवी मुंबईत भाजप नेते गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढू लागली असून नाईकांपेक्षा आम्हाला महाविकास आघाडीतील घटक पक्ष कधीही जवळचे वाटतात अशी जाहीर भूमिका मुख्यमंत्री समर्थकांनी जाहीर मेळाव्यात घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आम्हाला नवी मुंबईत उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या पक्षाचा किंवा काँग्रेसचा कधीच त्रास झाला नाही. मूळ भाजपशीही आमचे वैर नाही. मात्र ऐरोली, बेलापूर या दोन्ही जागा नाईकांना दिल्या तर आम्ही काम करणार नाही’, अशी जाहीर भूमिका घेत शिंदे सेनेच्या नेत्यांनी मंगळवारी बंडाची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा – उरणकरांच्या सुरक्षेसाठी ३४ ठिकाणी सीसीटीव्ही

नवी मुंबईत गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विळ्याभोपळ्याचे नाते आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी उमेदवारीवर दावा केल्याने शिंदेसेनेतील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. शिवसेनेचे (शिंदे) उपनेते विजय नहाटा यांनी यापूर्वीच आपण शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेणार असल्याचे जाहीर करत नाईक यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांनी दरडावल्यामुळे नहाटा यांचे बंड सध्या तरी थंडावल्याचे चित्र असले तरी मंगळवारी सायंकाळी उशिरा शिंदेसेनेच्या नेत्यांनी सानपाडा येथे घेतलेल्या एका मेळाव्यात गणेश नाईक यांच्याविरोधात भूमिका घेत ‘त्यांना उमेदवारी दिली तर काम करणार नाही’, असा इशारा देत थेट बंडाचे निशाण फडकविल्याचे पहायला मिळाले.

काय म्हणाले शिंदे समर्थक?

या मेळाव्यात मुख्यमंत्री समर्थक जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी नाईकांवर प्रहार करताना ‘आमचे भाजपशी वाकडे नाही’ असे स्पष्टीकरण दिले. गेल्या वेळेस युती असल्याने गणेश नाईक यांच्यामागे पक्षाची संपूर्ण ताकद उभी केली. नाईक ऐरोलीतून ८२ हजार मतांनी निवडून आले. हे मताधिक्य त्यांचे एकट्याचे होते का असा सवाल केला. मदत करूनही त्यांनी त्रास दिला. माझ्या मुलाची बदनामी केली, तुर्भेचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांची कामे बंद केली, मनोज हळदणकर यांना तुरुंगात टाकण्याचे कारस्थान रचले, असा आरोप चौगुले यांनी केला.

हेही वाचा – सेझ आंदोलन प्रकरणात माजी आमदारासह सात जण अटकेत, २००७ ला सिडको भवन परिसरात शिवसेनेने केले होते आंदोलन

‘महाविकास आघाडीचा त्रास नाही’

बेलापूर, ऐरोली या दोन्ही जागा गणेश नाईक यांना दिल्या तर आम्ही काम करणार नाही. वेळ आली तर अपक्ष निवडणूक लढवू असा इशारा मुख्यमंत्री समर्थकांनी दिला. ‘विजय नहाटा यांनी अजूनही पक्ष सोडलेला नाही. त्यांच्यावर ही वेळ का आली याचाही विचार झाला पाहिजे’, असे वक्तव्य पदाधिकाऱ्यांनी केले. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा आम्हाला नवी मुंबईत त्रास झाला नाही. आमदार मंदा म्हात्रे यादेखील आमच्याशी कधी वाईट वागल्या नाहीत. परंतु नाईकांनी नेहमीच आम्हाला पाण्यात पाहिले, असा आरोप केला.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde shivsena like mahavikas aghadi whats happening in navi mumbai issue with ganesh naik ssb