उरण येथील खाजगी बंदरातून होणाऱ्या कोळसा वाहतुकीचे काम स्थानिक वाहन मालकांना मिळावे या मागणीसाठी मंगळवारी कोळसा वाहतूक बंद करीत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जो पर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाहीत तो पर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार  असल्याचे मत पनवेल उरण लॉरी मालक संघाचे अध्यक्ष संतोष घरत यांनी व्यक्त केले आहे. तर वाहतूकदार आणि लॉरी मालक संघटना यांच्यात चर्चा होणार आहे. यातून हा प्रश्न सुटेल असा विश्वास उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान स्थानिक वाहतूकदारांनी आपली वाहने येथील मार्गावर उभी करून हे आंदोलन सुरू केले आहे.  कोळशाच्या वाहतूकीचे काम स्थानिकांना देण्यात यावे अशी मागणी करीत  स्थानिक उरण पनवेल लॉरी मालक संघाने  आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर वाहतुकदारांनी आठवडाभराची मुदत मागितली होती. ही मुदत संपल्या नंतर सोमवारी उरण पोलीस वाहतूकदार आणि स्थानिक लॉरी यांच्यात चर्चा झाली मात्र या चर्चेतून समाधानकारक तोडगा न निघाल्याने अखेर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला उरण पनवेल तालुक्यातील शेकडो स्थानिक वाहन चालकांनी पाठिंबा दिला आहे. यात रमण घरत,डॉ.मनीष पाटील,नरेश घरत,रवी घरत,रमाकांत घरत तसेच विविध पक्षाच्या नेत्यांनी ही पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा >>>नवी मुंबई : पाच मिनटांत अडीच लाखांची रोकड चोरी, पावती घेणे पडले महागात

उरण येथील एका बंदरातील कंपनीतून कोळशाची वाहतूक केली जाते.दररोज या कंपनीतुन  २२५-२५० अवजड वाहतुन हजारो टन कोळशाची वाहतूक  केली जाते.मात्र कोळसा वाहतुकीचे काम स्थानिक वाहतूकदारांना डावलून करण्यात येत आहे. वाहतुकीचे काम स्थानिक वाहतूकदारांनाच देण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.