मागणीत आणि किमतीत वाढ
गेल्या आठवडय़ापासून सतत वाढत असलेल्या उष्म्यामुळे शीतपेयांच्या मागणीत वाढ झाली आहे. उन्हात अंगाची लाही लाही होत असताना घसा ओला करण्यासाठी अनेक चाकरमानी रेल्वे स्थानक परिसर तसेच बस आगाराजवळच्या शीतपेयांच्या ठेल्यांकडे धाव घेत आहेत. खाद्यविक्रेत्यांचाही शीतपेयांच्या विक्रीकडे अधिक कल असल्याचे दिसत आहे.
लिंबू पाणी, नारळ पाणी, उसाचा रस व कोकम सरबत आदी आरोग्यवर्धक शीतपेयांना नागरिकांची अधिक पसंती असल्याने ही पेये मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. याशिवाय मिनरल वॉटर, बाटलीबंद शीतपेये व अन्य पेयांच्या मागणीत २५ टक्क्य़ांनी वाढ झाल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. मोसंबी, गाजर, अननस आदी फळांच्या रसांनाही मोठी मागणी आहे. बच्चे कंपनी काला खट्टा, कच्ची कैरी, मिल्क शेक तसेच बर्फाचा गोळा खाण्यात मग्न असल्याचे चित्र दिसत आहे.
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यावे. नारळ पाणी, लिंबू पाणी यांना प्राधान्य द्यावे. फ्रीजमधील पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नसल्याने ते टाळावे.
– डॉ. शाम यादव