आवक वाढल्याने दरात घसरण; खवय्यांच्या ताटात स्वस्त आणि चविष्ट मासळी
उरण : गेले पाच महिने सातत्याने बदलत असलेल्या हवामानामुळे खोल समुद्रातील मोठय़ा मासळीवर मच्छीमारांना पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे बाजारात पडलेल्या मत्स्यदुष्काळावर मात करण्याचे आव्हान उभे राहिले असताना मच्छीमारांना स्वस्त आणि चविष्ट बांगडय़ाने तारले आहे. गेले काही दिवस कोळ्यांच्या जाळ्यात बांगडा येऊ लागला आहे.
परिणामी बांगडय़ांची आवक वाढली आहे. त्यामुळे या मासळीचा किलोचा दर ५० ते ६० रुपयांवर आला आहे. यात मच्छीमारांचे नुकसान होत असले तरी मत्स्य दुष्काळात बांगडय़ानेच दिलासा दिला आहे. स्वस्त आणि चविष्ट मासा म्हणून बांगडा प्रत्येक हॉटेल मध्येही आढळून येता. या माशांची पैदासही मोठय़ा प्रमाणात होते. पावसाळ्यानंतर आलेल्या पाच वादळामुळे तसेच सातत्याने बदलत असलेल्या वातावरणामुळे मासळीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे मच्छीमारांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अशाही स्थितीत खोल समुद्रातील मासेमारीही जोरात सुरू झाली आहे. सध्या कोळ्यांच्या जाळ्यात बांगडा मासा सापडू लागला आहे. एका मासेमारी बोटीला दररोज पाच ते दहा टन बांगडे मिळत असल्याची माहिती करंजा येथील मच्छीमारांनी दिली.
आकारानुसार दर
बांगडय़ातही तीन ते चार प्रकारचे मासे आकारानुसार आढळतात. यात सर्वात मोठा बांगडा हा साधरण कोणत्याही मोसमात ११० ते १२० रूपये किलोला विकला जातो. परंतु सध्या सापडणाऱ्या बांगडय़ात वेगवेगळे आकार आढळत असल्याने त्यांचे दरही कमी झाले आहेत. मासेमारी व्यवसाय जोखीम पत्करून केला जातो. त्यात नफ्याचे गणितही जुळून येते. एकाच मोसमात कोटय़वधी रुपयांची मासळी मच्छीमारांच्या जाळ्यात येते. परंतू अशी घटना क्वचित घडते. यंदा लांबलेल्या पावसामुळे मच्छीमारांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. मात्र सध्या बांगडय़ाने हात दिला आहे.