नवी मुंबई : शहरातील बेलापूर ते एरोली विभागांत मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून या बांधकाम व्यावसायिंकाच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वनी, वायू प्रदूषण तसेच स्फोटांमुळे बसणाऱ्या हादऱ्यांबाबत वाढत्या तक्रारींमुळे नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींबाबत योग्य ते निराकारण होण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड हे या समितीचे प्रमुख राहणार आहेत.
महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी शहरातील बांधकामांबाबत, तक्रार निवारणाबाबत एक समिती स्थापन करून त्याची एसओपी नियमावली करण्यात येणार असल्याचे लोकसत्ताला सांगितले होते. त्यानुसार समिती स्थापन केली असून अतिरिक्त शहर अभियंता, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक, सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ मायनिंग व तेल रिसर्चचे मुख्य शास्त्रज्ञ, पेट्रोलियम व एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायजेशनचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी आणि संरचना अभियांत्रिकी विभाग वीर माता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्युट माटुंगा मुंबईचे प्रमुख डॉ. केशव सांगळे हे समितीमध्ये आहेत. आगामी काळात शहरातील बांधकामाबाबत तसेच ब्लास्टिंगबाबतच्या तक्ररींचे निवारण या समितीमार्फत होणार आहे.
हादऱ्यांमुळे एका इमारतीच्या गच्चीचा स्लॅब काही दिवसांपूर्वी कोसळला होता. त्यानंतर मंगळवारी महिला गंभीर झाली. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार समिती निश्चित करणे गरजेचे असल्याने विविध विभागाच्या सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. – शिरीष आरदवाड, अध्यक्ष, मानक ऑपरेटिंग प्रक्रिया समिती