लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सागर नाईक यांच्या नावाचा गैरवापर करून राज्यात आमदार आणि प्रतिष्ठित व्यक्तींकडून अज्ञात व्यक्ती पैशाची मागणी करीत असल्याचा खळबळजनक, गंभीर प्रकार उघड झाला आहे. या विरोधात सागर नाईक यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे १ ऑक्टोबर २०२३ रोजी लेखी तक्रार दाखल करून या गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सागर नाईक यांच्या नावाचा वापर करून कधी व्यवसायात भागीदारी करण्याचे नावे अथवा कंत्राट देण्याच्या नावे पैसे उकळले जात आहेत. काही दिवसांपूर्वी मुरबाड येथे राहणारे मोहन सासे यांच्याकडून संशयित सचिन परदेशी या व्यक्तीने सहा लाख रुपये उकळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ९९३९९८९००९ या मोबाईल क्रमांकावरून पैसे उकळण्यासाठी फोन केले जात आहे. मुरबाड येथील मनोज सासे यांची देखील अशाच प्रकारे सहा लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. मुरबाड येथील मनोज सासे यांची देखील अशाच प्रकारे सहा लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे.
हेही वाचा… मच्छीमार खर्चाच्या जाळ्यात; ग्राहक महागाईच्या लाटेत!
माजी महापौर सागर नाईक यांनी केलेल्या लेखी तक्रारीमध्ये या गंभीर प्रकरणांमध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई करून संबंधित व्यक्तीचा शोध घ्यावा. त्यांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. या प्रकरणांमध्ये माजी महापौर सागर नाईक यांची बदनामी करण्याचे कारस्थान दिसून येत असून फसवणूक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होते आहे. कोणत्याही व्यक्तीस माझ्या नावे फोन आले तर त्याची शहानिशा करावी अशी सावधगिरीची सूचना सागर नाईक यांच्या वतीने करण्यात आली आहे.