नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागाकडे तक्रार करून खंडणी मागणाऱ्या शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचा उपशहर प्रमुख किशोर लोंढे तसेच अन्य एका अनोळखी व्यक्ती विरोधात कोपरखैरणे पोलिसांनी १२ तारखेला (शनिवारी) खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वाशी, सानपाडा आणि कोपरखैरणे या तीन ठिकाणी एका व्यापाऱ्याची मिठाईची दुकाने आहेत. या दुकानाच्या बाहेर संबंधित व्यापाऱ्यांकडून खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल लावले जातात. या स्टॉलच्या विरोधात तुर्भे स्टोर येथील उध्दव ठाकरे शिवसेनेचा उप शहर प्रमुख किशोर लोंढे यांनी महापालिकेकडे तक्रार केली.
या तक्रारीवर कारवाई टाळण्यासाठी दुकान मालकाकडे महिना १५ हजार आणि सध्या गुड विल म्हणून तीन लाख रुपयांची खंडणी उकळण्यासाठी धमकवण्यात आले होते. एवढी रक्कम देण्यास दुकानदाराने असमर्थता व्यक्त केली होती. याबाबत बोलणी करण्यासाठी या खंडणीखोर पदाधिकाऱ्याने वाशी येथील एका हॉटेलात व कोपरखैरणे येथे कलश उद्यान नाजिक चर्चा करून २० हजार आणि दहा हजार रुपयांची रक्कम लोंढे याला देण्यात आली.
मात्र आणखी रकमेसाठी त्याचा तगादा सुरूच असल्याने अखेर व्यापाऱ्याने पोलिसांकडे धाव घेतल्यावर लोंढे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीच्या धमकीला बळी पडले कि ते त्यांच्या अन्य लोकांना माहिती देतात. पुन्हा त्यांची मागणी सुरु होऊ शकते या भीतीपोटी संबंधित व्यापाऱ्याने याबाबत तक्रार दिली होती. त्या संशयित व्यक्ती त्यांच्याशी बोलतानाचे चित्रीकरण फोटो तसेच फोनवर बोलणी झालेले रेकॉर्डिंग आदी जमा करण्यात आले आहे. या संशयित खंडणीखोरांना अद्याप अटक करण्यात आलेले नाही.