उरण : वाढत्या काँक्रीटीकरणामुळे भूजलगर्भातील पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे उरण परिसरातील अनेक हात पंपाचे पाणी गायब होऊ लागले आहे. भूगर्भातील घटती पाणी पातळी ही चिंतेची ठरू शकते. उरण हा सर्वात वेगाने विकसित होत असलेला परिसर आहे. येथील विविध प्रकल्प आणि औद्योगिक विकासासाठी मोठ्या प्रमाणात सिमेंटचे काँक्रीटीकरण सुरू आहे. यात प्रकल्प आणि रहिवाशी इमारती ही वाढू लागल्या आहेत. यात जमिनीवर काँक्रीटीकरण केले जात आहे. तर याच विभागात शहर,गाव आणि उद्योग परिसराला जोडणाऱ्या रस्ते मार्गाच्या काँक्रीटीकरण केले जात आहे. या काँक्रीटीकरणामुळे पावसाळ्यातील भूगर्भात मुरत असलेले पाणी पुरेसे मुरत नसल्याने या भूगर्भातील पाणी पातळी घटू लागली आहे.

उरणमध्ये दरवर्षी अडीच ते तीन हजार मिलिमीटर पावसाची नोंद होते. यातील बहुतेक पाणी समुद्रात वाहून जात आहे. परिणामी येथील नागरिकांना उन्हाळ्यात प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या विकसित परिसरात ही टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. या वाढत्या सिमेंट काँक्रीटीकरणामुळे शेतीवरही परिणाम होऊ लागला आहे. उरण मधील अनेक रहिवासी वस्त्या तसेच व्यवसाय आणि फार्म हाऊस आदी ठिकाणी भूगर्भातील पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र यातील अनेक हात पंपांचे पाणी कमी किंवा बंद झाले असल्याची माहिती करंजा येथील नागरिक मार्तंड नाखवा यांनी दिली आहे. दरम्यान, भूगर्भातील पाणी पातळी कमी झाल्याने समुद्राची पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे रिकाम्या झालेल्या भूगर्भात समुद्राचे खारे पाणी येऊ लागले असून बोअरवेलमध्ये समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा शिरकाव होऊ लागला आहे.

नैसर्गिक जलपुनर्भरण प्रकिया बंद

वाढती सिमेंट काँक्रिटीची जंगले आणि अनेक ठिकाणी जमिनीत पाणी मुरण्यासाठी असलेली ठिकाणे शहरापासून खेड्यापर्यंत बुजविण्यात आली आहेत. त्यात प्लास्टिकच्या अमर्याद वापराचाही परिणाम झाला आहे. या प्लास्टिकचा एक थर जमिनीवर निर्माण झाला आहे. त्यामुळे जमिनीत पाणी जात नसल्याने नैसर्गिकरित्या जमिनीत होणारे जलपुनर्भरण थांबले आहे. परिणामी भुजलगर्भातील पाणी पातळी कमी होऊन जमीन कोरडी पडू लागली आहे. याचा फटका शेती व्यवसाय आणि पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या साठ्यांना ही बसत आहे. त्यामुळे जलपुनर्भरणाची ही प्रक्रियाच बंद पडली आहे. ती पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

कोट नैसर्गिकरित्या जमिनीत पाणी मुरत नसल्याने संपूर्ण निसर्गावर याचा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे ही प्रकिया पुनः सुरू करण्यासाठी आम्ही हे कार्य हाती घेतले आहे. जलपुनर्भरण करण्यासाठी पावसाळ्यातील घराच्या छताचे पाणी ज्या ठिकाणी पडते तेथे एक खड्डा करून त्यात दगड, रेती टाकली जाते जेणेकरून हे पाणी थेट जमिनीत मुरेल आणि त्यातून भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल.जयवंत ठाकूर, अध्यक्ष, फॉन संस्था