पनवेल: बेलापूर ते पेणधर या मार्गिकेवर नवी मुंबई मेट्रो रेल्वेचा प्रवास उदघाटनाअभावी सूरु न होऊ शकल्याने राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने सामान्य प्रवाशांसाठी लवकर उदघाटन करा अन्यथा आम्ही मेट्रोचे उदघाटन करु असा इशारा दिला आहे. पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी एक लेखी पत्र काढून हा इशारा दिला आहे.
हेही वाचा >>> जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड आरक्षणाचा दसऱ्याचा मुहूर्त सरला; आता भूखंड निश्चिती आणि नामफलकाची प्रकल्पग्रस्तांना प्रतिक्षा
सिडको महामंडळाने मागील १० वर्षापासून नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातून प्रत्यक्ष प्रवास सूरु करण्याच्या अनेक तारखा जाहीर केल्या आहेत. मागील महिन्याभरापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन झाल्यावर या रेल्वेतून प्रवास करता येईल अशी अपेक्षा खारघर, तळोजा आणि बेलापूर वासियांना होती. मात्र ऑक्टोबर महिन्यात या रेल्वेचे उदघाटन होऊ शकले नाही. अनेक अडचणींचा सामना हा प्रकल्प उभारण्यासाठी झाला आहे. सर्व कामे पुर्ण झाल्यावर उदघाटनासाठी मागील चार महिन्यापासून तारखांची जुळवाजुळव होत आहे. कॉंग्रेस पक्षाने देशाच्या पंतप्रधानांना नवी मुंबईकरांसाठी सुलभ असणाऱ्या मेट्रोच्या लोकार्पणासाठी वेळ नसल्याचा आरोप केला आहे. बेलापूर ते पेणधर या मेट्रोमुळे सध्या नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम सेवेच्या बसमधून प्रवास करणारे, तसेच प्रवासी इकोव्हॅनने प्रवास करणा-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. थेट ४० रुपयात तळोजा वसाहतीमधून बेलापूर स्थानकात जाता येणार आहे. पंतप्रधान मोदी हे वेगवेगळ्या राज्यातील निवडणुकांमध्ये व्यस्त असल्यामुळे मेट्रोच्या लोकर्पणासाठी अनेक तारखा दिवसांदिवस वाढविल्या जात असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना मेट्रोच्या प्रकल्पाची सूरुवात झाली. त्यामुळे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची मुहूर्तमेढ काँग्रेस सरकारने रोवल्याचे आठवण कॉंग्रेसच्या पदाधिका-यांनी केली आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या अंतिम तयारीसाठी सिडको मंडळाने करोडो रुपये खर्च केला असल्याने पंतप्रधान येणार असल्याने हेलिपॅड तयार करून ठेवले आहे. तरीही मेट्रोचे उदघाटन न झाल्याने पनवेलच्या कॉंग्रेसने सामान्य प्रवाशांसाठी उदघाटन करु असा इशारा दिला.