नवी मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रात आता सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे शक्य नाही. परंतु मुंबईच्या नजीकच असलेल्या रायगड महानगर क्षेत्रात अद्याप ५० टक्के जागा मोकळी असून त्या ठिकाणी परवडणारी घरे देणे शक्य आहे. नवी मुंबईत होऊ घातलेल्या विमानतळामुळे आगामी काळात पायाभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्यास तीन वर्षांत महाराष्ट्राचे उत्पन्न दुपटीने वाढणार आहे. या भागात वेगवान पायाभूत सुविधा निर्माण केल्यास हैदराबाद व बंगळुरू या ठिकाणी असलेले ‘आयटी हब’ही रायगडमध्ये येऊन महाराष्ट्रातील व देशातील युवा पिढी परदेशात जाण्याऐवजी ती रायगड महानगर क्षेत्रात आयटीसाठी स्थिरावणार आहे.
याच नवी मुंबई व रायगड भागांतून पर्यटक हा गोव्याला जातोय, परंतु या ठिकाणी भौतिक सुविधा दिल्यास हेच पर्यटक रायगड अलिबाग येथे स्थिरावणार आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीनेही या क्षेत्राला आगामी काळात मोठे महत्त्व येणार असल्याचे हिरानंदानी समूहाचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केले.
राज्यातील औद्योगिक उत्पादनाच्या २५ टक्के वाट याच रायगड महानगर क्षेत्रातून जातो. तर परदेशात आवक जावक होते, त्यात ४० टक्के वाटा याच रायगड महानगर क्षेत्रातून जातो. तर जेएनपीटी बंदराचा वाटा सर्वाधिक आहे. त्यामुळे रायगडचे भविष्य उज्ज्वल आहे. आगामी काळात पाच टाऊनशिप विकसित करायला हव्यात. त्यामुळे रायगडला देशात वेगळे महत्त्व प्राप्त होणार असल्याचे मत हिरानंदानी यांनी अधोरेखित केले आहे.