नवी मुंबई  : सिवूड्स सेक्टर ४४ मधील अमन बिल्डर्स या कार्यालयात बांधकाम व्यावसायिक मनोज सिंग यांची डोक्यात लोखंडी सळई घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी चोवीस तासांच्या आत छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मृत मनोज सिंगकडे असणारा वाहन चालक आणि सिंग यांच्या पत्नीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. तसेच वाहन चालकाला अटक करण्यात आले असून त्याच्या पत्नीलाही लवकरच अटक करण्यात येणार आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी सिवूड्स सेक्टर ४४ येथील अमन डेव्हलपर्सच्या मनोज सिंग नावाच्या बांधकाम व्यावसायिकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात त्यांच्याच कार्यालयात आढळून आला होता. सकाळी नेहमी प्रमाणे कार्यालयात काम करणारे आल्यावर ही बाब उघड झाली होती. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक आयुक्त राहुल गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल हे पथकासह घटनास्थळी आले होते. मृतदेहाची अवस्था पाहता सुरुवातीला हत्या गोळी घालून करण्यात आली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांना होता.

हेही वाचा…बेलापूरची राणी मीच : भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांची टोलेबाजी

मात्र नंतर हत्या गोळी घालून नव्हे तर अन्य जड वस्तू डोक्यात घालण्यात आल्याने झाली असल्याचे तपासादरम्यान समोर आले. पोलिसांनी सिंग यांच्याशी संबंधित सर्वांची कसून चौकशी सुरु केल्यावर त्यांचा वाहन चालक शमहोद्दीन खान याला समर्पक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे त्याला ताब्यात घेत थेट पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या ठिकाणी पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने हत्या केल्याची कबुली दिली तसेच यात मृत सिंग यांच्या पत्नीचाही समावेश असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या पत्नीची चौकशी केल्यावर तिनेही सहभागी असल्याबाबत माहिती दिली. खान याला अटक केल्यावर रविवारी विशेष न्यालयालयासमोर हजर केले असता १८ जानेवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 

मनोज सिंग यांच्या पत्नीचे आणि त्यांचे पटत नव्हते. सिंग यांना काही वर्षांपूर्वी फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आली होती. चार महिने ते कारागृहात असताना त्यांची पत्नी व वाहन चालक आणि पडेल ते काम करणारा खान यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. यातूनच मनोज सिंग यांची हत्या करून पूर्ण मालमत्ता आपल्याला मिळेल या विचाराने सिंग यांची पत्नी आणि खान यांनी सिंग यांची हत्या करण्याची योजना शिजत होती. शुक्रवारी ही योजना प्रत्यक्षात उतरविण्यात आली. अद्याप सिंग यांच्या पत्नीला अटक करण्यात आली नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. 

हेही वाचा…चाणक्य तलाव वाचविण्यासाठी निसर्गप्रेमींचे दर रविवारी आंदोलन, सिडकोच्या नाकर्तेपणामुळेच चाणक्य तलाव बुजवण्याचा घाट

शुक्रवारी रात्री सिंग काम जास्त असल्याने कार्यालयात होते. तर वेळ झाल्यावर कर्मचारी निघून गेले होते. त्यांनतर खान यांनी सिंग यांच्या कॅबिनमध्ये प्रवेश केल्यावर लोखंडी सळईने जोरदार घाव सिंग यांच्या डोक्यात घातला आणि नंतर अनेक घाव देत राहिला त्यातच सिंग हे गतप्राण झाले. हे लक्षात आल्यावर खान गुपचूप निघून गेला. विशेष म्हणजे हे कृत्य करण्यापूर्वी त्याने सीसीटीव्ही आणि डीव्हीआर काढून नेले होते. याचाही तपास पोलीस सध्या करत आहेत. 

ही योजना पूर्ण यशस्वी झाल्यावर सिंग याची पत्नीने ठरल्या प्रमाणे काही लोकांची नावे घेत हे लोक भेटण्यास येणार होते, असे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी सिंग याच्या पत्नीने सांगितलेल्या लोकांचीही चौकशी केली. त्यात त्या लोकांचा या हत्येत कुठलाही सहभाग नाही या निष्कर्षापर्यंत पोलीस आले होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction businessman murdered in navi mumbai wife and driver accused driver arrested psg
Show comments