कामोठे वसाहतीमधील सेक्टर २० येथील उद्यानामध्ये जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले असले तरीही हे केंद्र कधी सुरू होणार याच्या प्रतीक्षेत कामोठेमधील जेष्ठ नागरिक आहेत. सिडकोच्या वतीने या केंद्राचा लोकार्पण सोहळ्याला मुहूर्त निघत नसल्याने हा घोळ झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा सोहळा करण्याचे निश्चित होते, मात्र तो होऊ शकला नाही. मागील ३ वर्षांपासून वसाहतीमध्ये ज्येष्ठांसाठी हक्काचे ठिकाण मिळावे, म्हणून जेष्ठ नागरिक संस्थेने पाठपुरावा केल्यानंतर सिडकोने येथे विरंगुळा केंद्र बांधले.
एकही उद्यान नसलेल्या कामोठे वसाहतीमध्ये उद्यान आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असावे, अशी मागणी वसाहतीमधील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन सिडकोदरबारी केली. २०१३ पासून ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सदस्यांनी या मागणीचा पाठपुरावा सुरू केला. अनेक वेळा आश्वासने देऊन या ज्येष्ठांची बोळवण करण्यात आली. या संस्थेमधील प्रत्येक ज्येष्ठ सदस्यांनी विरंगुळा केंद्र मिळविण्यासाठी लेखी आणि वैयक्तिक स्वरूपातील पाठपुरावा सिडको प्रशासनाकडे सुरूच ठेवला.
सेक्टर २० येथील ४ हजार चौरस मीटरच्या मोकळ्या जागेवर हे उद्यान विस्तारले आहे. त्यापैकी ३० चौरस मीटर जागेवर या ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारले आहे. एका सभागृहासोबत येथे ज्येष्ठांच्या संस्थेची कागदपत्रे ठेवण्यासाठी कपाटांची सोय करण्यात आली आहे. तसेच केंद्राशेजारी एका स्वच्छतागृहाची सोय आहे. सेक्टर २० येथील उद्यानामध्ये एक एम्पी थिएटर आहे. या थिएटरमध्ये एकाच वेळी सुमारे शंभर जण खुल्या कार्यक्रमाचा आनंद येथे घेऊ शकतील. प्रजासत्ताक दिनाला विरंगुळा केंद्राचा लोकार्पण सोहळा पुढे ढकलल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात हा सोहळा होईल अशा हालचाली होत्या. परंतु अद्याप तसे झाले नाही. सध्या कामोठे येथील ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सभासद २२० जण आहेत. या विरंगुळा केंद्रामुळे ज्येष्ठांना त्यांच्या बैठकांसाठी हक्काचे स्थान मिळेल. सिडकोचे अधीक्षक अभियंता किरण फणसे यांनी याबाबत दोन दिवसांत तारीख निश्चित करण्यात येईल, असे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
कामोठे वसाहतीमध्ये उद्यानांसाठी १५ भूखंड राखीव होते. यातील ६ भूखंडांवर अनियंत्रित बांधकामे झाल्यामुळे उर्वरित ९ भूखंडांवर उद्यानांचे काम सिडकोला सुरू करण्याची वेळ आली. चार कोटी रुपये खर्च करून सिडको सामान्यांसाठी या उद्यानांचा विकास करीत आहे. येत्या दहा महिन्यांत कामोठेवासीयांना वसाहतीमधील उद्यानांचा लाभ घेता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा