परदेशात निर्यात होणाऱ्या मालाचे कंटेनर फोडून चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद करण्यात आली. नवी मुंबई गुन्हे शाखा युनिट- २ ने ही कामगिरी केली. या वेळी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून एक कोटी ७० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुभाष जैन, मुकेश शर्मा, अश्विन गुलसिंग अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
नायजेरियात निर्यात होणारे एक कोटी ९६ लाख रुपयांचे २१ टन वजनाचे सिंथेटिक कापड भिंवडी येथील ‘एस नॅशलन कंटेनर मूव्हर्स’ ही वाहतूक कंपनी करते. हा माल जेएनपीटी आणि न्हावा शेवा येथे अनिल सायरचंद कवाड यांनी पोहोचविण्यासाठी दिला होता. परंतु कंटेनरचालकाने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने दोन कोटी १७ लाख ४० हजारांचा माल लंपास केला.
या प्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त प्रभांत रंजन, पोलीस उपआयुक्त गुन्हे दिलीप सांवत यांच्या मार्गदर्शनाखाली तीन तपास पथके तयार करण्यात आली. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. व्ही. कोल्हटकर यांना सूत्रांकडून माहिती मिळाली की, कंटनेर फोडून मालाची चोरी करणारी आंतरराज्य टोळी असून त्यांचे धागेदारे भिंवडी, गुजरात, दिल्ली या ठिकाणी आहेत. त्यानुसार भिवंडी, वापी आणि दिल्ली येथे पथके रवाना करण्यात आली. पोलिसांनी दिल्ली येथून कपडय़ांची तस्करी करणारे आरोपी सुभाष जैन, मुकेश शर्मा, अश्विन शिवाच ऊर्फ अजय यांना अटक करण्यात आली. पोलीस कंटेनर चालक आणि साथीदाराचा शोध घेत आहेत.
कंटेनर मालाची चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
परदेशात निर्यात होणाऱ्या मालाचे कंटेनर फोडून चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद करण्यात आली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 07-05-2016 at 01:25 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Container goods theft gang arrested