नवी मुंबई महानगरपालिकेचा कारभार लोकाभिमुख व्हावा, याकरिता संगणकीय सुविधांचा अधिकाधिक वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. ई-गव्हर्नन्सची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मंगळवारी पालिका मुख्यालयात आयुक्तांच्या हस्ते ‘होस्ट टू होस्ट’ या प्रणालीचा शुभांरभ करण्यात आला. कंत्राटदारांना धनादेशाद्वारे होत असलेली अदायगी येत्या काळात थेट बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे धनादेशासाठी पालिकेत घालावे लागणारे खेटे वाचणार आहेत.
आरटीजीएस या संगणकीय प्रणालीपेक्षा इलेक्ट्रॉनिक्स क्लिअिरंग प्रणाली (होस्ट टू होस्ट) अधिक अत्याधुनिक आहे. राज्यातील महानगरपालिकांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पहिल्यांदाच राबवली जात असल्याचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी धनराज गरड यांनी स्पष्ट केले. अ‍ॅक्सिस बँक यांच्या माध्यमातून ही सुविधा कार्यान्वित होत आहे. यामुळे कामातील गतिमानता वाढणार आहे. याद्वारे पुढील काळात पैसे कंत्राटदार आणि पुरवठादारांच्या थेट बँक खात्यात जमा होतील.

Story img Loader