नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात पालिकेच्यावतीने कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली जातात. नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवून कोट्यावधींची कामे शहरात होत असतात. परंतु, नियमानुसार एखाद्या कामाबाबतचा ठेका संबंधित ठेकेदाराला प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष काम करताना आपल्या कामाबाबतचा संपूर्ण माहिती फलक कामाच्या ठिकाणी लावणे आवश्यक असते. परंतु, महापालिकाक्षेत्रात बऱ्याच वेळा ठेकेदार याबाबतचे नियम पायदळी तुडवत असल्याचे पाहायला मिळते. याबाबत संबंधित विभागप्रमुख, तसेच संबंधित अधिकारी यांनी याबाबत कटाक्षाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात शहर अभियंता, उद्यान, पाणीपुरवठासह अनेक विभागांत कोट्यावधी रुपयांची अनेक कामे सुरू असतात. पालिका पातळीवर होणाऱ्या कामाबाबत रितसर प्रक्रिया राबवूनच काम संबंधित ठेकेदाराला दिले जाते. परंतु, शहरात सुरू असलेल्या या कामाबाबत जनतेलाही याची माहिती असावी यासाठी या कामाचे माहितीफलक कामाच्या ठिकाणी लावणे अत्यावश्यक आहे, परंतु पालिकेत बऱ्याच वेळा अनेक ठेकेदार आपल्या कामाबाबतचे फलक दर्शनी भागात लावत नाहीत, तर काहीजन कामाबाबतचे व निविदेबाबतचे फलक लावण्याची तसदी घेत नाहीत.
नेरूळ विभागात सेक्टर ६ येथे जिजामाता उद्यानाचे काम सुरू असून याठिकाणी होत असलेले काम हे उद्यान व शहर अभियंता विभागामार्फत करण्यात येत आहे. परंतु, या कामाच्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने कामाचा तपशील असलेला फलक लावणे आवश्यक आहे.
नवी मुंबईत विविध प्रकारची कामे महापालिकेच्या माध्यमातून केली जातात. नेरुळ येथील जिजामाता उद्यान सेक्टर ६ येथे काम सुरू असून ठेकेदाराने कामाबाबत व निविदेबाबत माहिती देणारा फलक लावला नाहीच सामान्य नागरिकांनाही कोणते काम किती रुपयांचे आहे. कधी संपणार आहे याची माहिती होणे गरजेचे आहे. पालिकेने याबाबत योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे महादेव पवार, राष्ट्रवादी काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष नेरुळ यांनी सांगितले.
शहरात सुरू असलेल्या विविध कामांबाबतचे फलक लावणे आवश्यक असून संबंधित ठेकेदार तसेच अधिकारी यांना याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याबाबत सूचित करण्यात येईल, असे शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितले.