पहिल्या टप्प्यातील घरे ऑक्टोबर २०२० पर्यंत; येत्या काळात आणखी ४० हजार घरे

खासगी विकासकांप्रमाणे पहिल्यांदाच बांधकाम आणि विक्री एकाच वेळी करणाऱ्या सिडकोची पहिल्या टप्यातील १३ हजार ९७४ घरे ही दोन वर्षांनी तर ८६४ घरे मार्च २०२१ मध्ये मिळणार आहेत. मंगळवारी एक लाख ९१ हजार ग्राहकांमधून १४ हजार भाग्यवंत ग्राहक निवडण्याची प्रक्रिया सिडको मुख्यालयात पार पडली. या पंधरा हजार घरांबरोबर सिडको येत्या काळात आणखी ४० हजार घरे विक्रीसाठी बाजारात आणणार आहे.

सिडकोने १४ हजार ८३८ घरांची एकाचवेळी विक्री केली आहे. यातील काही घरे ही विशिष्ट आरक्षणाची असल्याने ती विकली जाणार नाहीत पण ही संख्या तुरळक आहे. त्याची यादी काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. भाग्यवंत ग्राहकांना एसएमएसद्वारे घर मिळाल्याचे कळविण्यात आले आहे. सिडकोच्या संकेतस्थळावर या सोडतीचे थेट प्रक्षेपण असताना एक हजारपेक्षा जास्त ग्राहक सिडकोत आले होते. त्यामुळे सोडतीला चांगलीच गर्दी झाली होती. एखाद्या ग्राहकाला घर मिळाले नाही पण त्याची कोणत्याही नोडमध्ये घर घेण्याची तयारी आहे आणि त्या ठिकाणच्या घराला मागणी आलेली नाही तर ते घर मिळण्याची तरतूद सिडकोच्या सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आली आहे. मंगळवारी काढण्यात आलेल्या भाग्यवंतांना प्रथम तळोजा, नंतर खारघर, कळंबोळी, घणसोली आणि सरतेशेवटी द्रोणागिरीतील ग्राहकांना घरे मिळणार आहेत.

ग्राहकांना कर्जाचे सुलभ हप्ते घेणे शक्य आहे. यापूर्वी ग्राहकांना तयार घरासाठी एकदम कर्ज घ्यावे लागत होते आणि त्याचा येणारा मासिक हप्ता न पेलणारा होता. या वेळी घरांच्या कामाप्रमाणे हप्ते द्यावे लागणार असल्याने ही रक्कम टप्प्याटप्प्याने वाढणार आहे.

घरे कधी मिळणार?

घर खरेदी करतानाच सिडकोने ही घरे कधी देणार याची यादी प्रसिद्ध केली आहे. यात ऑक्टोबर २०२० रोजी ११,१७८ ग्राहकांना घरे मिळणार असून यात आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ आणि अल्प उत्पन्न गटातील अशा दोन्ही ग्राहकांचा समावेश आहे. त्यानंतर २ हजार ७९६ घरे सिडको डिसेंबर २०२० मध्ये देणार असून शिल्लक ८६४ घरे ही मार्च २०२१ मध्ये देणार आहे.