संतोष जाधव
नवी मुंबई : नेरुळ येथील वंडर्स पार्क नवी मुंबई शहरातील लँडमार्क असून नवी मुंबई शहराबरोबरच उरण,पनवेल,ठाणे, मुंबई या परिसरातील शहरातील अबाल वृद्धांसह हजारो नागरीक इथे भेट देत असतात. शहरातील आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या या पार्कमध्ये नव्याने सुरु करण्यात आलेले आकर्षक राईड्स, कारंजे तसंच लेझर शो यांची व्यवस्था करण्यात आली आहे. करोना काळापासून जवळजवळ अडीच वर्षापेक्षा अधिक काळ सर्वसामान्यांसाठी हे पार्क बंद आहे. असं असतांना उद्घाटनासाठी तारीख पे तारीख सांगितली जात आहे, उद्घाटन कधी होणार हे निश्चित नाही, पालिकेकडून कोणताही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. असं असताना स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता आमदार गणेश नाईक व आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार असल्याची पोस्ट समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली आहे.
त्यामुळे आता वंडर्स पार्क उद्घाटनावरून प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये वादंग सुरू होणार असल्याचे चित्र आहे. मागील अनेक दिवसापासून वंडर्स पार्क उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर या पार्कमधील वनस्पती राइट्स बंद करण्यात येत असल्याने लवकरात लवकर उद्घाटन करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आह. आता या लोकप्रतिनिधींच्या उद्घाटनाच्या पोस्टवरून पार्कचे उद्घाटन नक्की कधी होणार याबाबत जबाबदार चर्चा सुरू झाली आहे.
या पार्कमध्ये असलेली आकर्षक खेळणी, जगातील सात आश्चर्य दाखवणाऱ्या प्रतिकृती यासह अँम्पीथिएटर याबरोबरच आकर्षक तलाव, खेळण्यासाठी असलेली प्रशस्त खेळण्याची जागा आहे. त्याचबरोबर नव्याने करण्यात आलेल्या म्युझिकल फाऊंटन लेझर शोसहित,ऑडिओ व्ह्युजअल यंत्रणा ,तलावांची दुरूस्ती,वॉक वे सुधारणा,नव्याने विविध खेळांच्या साहित्याचे तसेच खेळण्यांखालील रबर मॅट बदलणे,सर्व ठिकाणी सी.सी.टि.व्ही कॅमेरा बसविणे,प्रवेशद्वारावर बायोमॅट्रीक मशीन लावणे,नवीन विद्द्युत दिवे लावणे अशी जवळजवळ ३० कोटी पेक्षा अधिकच्या खर्चातून वंडर्स पार्कचे पूर्णतः मेकओव्हर करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वानाच या पार्कची उत्सुकता आहे. परंतु आता उद्घाटनापूर्वीच वादंग सुरू झाला आहे.
हेही वाचा… नवी मुंबई : खोदकामांसाठीची २५ मे ची मुदत संपली, तरीही शहरात खोदकामे सुरुच…
वंडर्स पार्क लवकरात लवकर सुरु करण्यासाठीचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. वंडर्स पार्क उद्घाटनाची तारीख निश्चित नसून उद्घाटनाबाबतची जी पोस्ट पाठवण्यात येत आहे ती चुकीची आहे. – राजेश नार्वेकर,आयुक्त ,नवी मुंबई
वंडर्स पार्कचे काम पूर्ण होऊनही पालिका प्रशासनाकडून वेळ काढूपणा सुरू आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने ऐरोली व बेलापूरच्या आमदार यांच्या हस्ते वंडर्स पार्कचे सोमवारी उद्घघाटन करण्याचा आमचा निश्चय आहे. नागरिकांच्या मनोरंजनासाठी हे पार्क असल्याने त्याचे सोमवारी उद्घघाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. – रवींद्र इथापे, माजी सभागृह नेता