सेंट्रल पार्क, खारघर
खारघरचे सेन्ट्रल पार्क म्हणजे विस्तीर्ण हिरवळ. सकाळी फिरण्यासाठी गेले की इथे गुलाबी थंडी असते. प्राणवायू आणि तो टिकविण्यासाठी तंदुरुस्त शरीर कमावण्यासाठी शेकडो चालती आणि धावती पावले येथे येतात. खारघरच नव्हे तर नवीन पनवेल, कळंबोली आणि बेलापूरहून नागरिक येथे येतात आणि दिवसभर राबण्यासाठी छातीत ऊर्जा भरून घेतात.
पहाटे चालणे अनेकांना जड जाते. सवय नाही. त्रास होतो, अशी कारणे छातीठोकपणे देणारे अनेक जण भेटतात; पण खारघरमध्ये सिडकोने २२ हेक्टर जमिनीवर बांधलेल्या सेंट्रल पार्कमध्ये गेल्यावर हळूहळू हलकं वाटायला लागतं आणि त्रास मागे पडून चालणं सवयीचं होते. सकाळच्या गुलाबी थंडीत हिरवळीवर कळंबोली, नवीन पनवेल आणि बेलापूरमधून चालणारी पावलं इकडे वळतात. मोठय़ा संख्येने सेंट्रल पार्कवरील वाऱ्याशी अनेक जण स्पर्धा करीत घाम गाळतात. तंदुरुस्तीचं सेन्ट्रल पार्क हे सध्या ठिकाण बनलं आहे.
पहाटे साडेपाचला चालती पावले इकडे येण्यास सुरुवात होते. चारचाकी आणि दुचाकी याशिवाय सोबत श्वान घेऊन इथे अनेक जण ‘वॉक’ला सुरुवात करतात. पहाटे इथे धुके असते, या कल्पनेनेच अनेकांना आनंद होतो. चाळिशीनंतरच्या पुरुष आणि महिलांची संख्या यात मोठी आहे. दोन पावलांमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवून चालणारे, काही जण प्रमाणित चाल ठेवून व्यायाम करतात. गोल्फ कोर्सला लागून असलेल्या या पार्कमध्ये सकाळची थंडी पडलेली असते. त्यामुळे येथे तुलनेने कमी थकवा येतो. उन्हाळ्यातही वातावरण सारखेच असते, असे येथील नागरिक सांगतात.
कानाला मोबाइल संगीताचे इयरफोन लावून तालबद्ध चालणे वा धावणे येथे सुरू असते. हातात पाण्याची बाटली अथवा एनर्जी ड्रिंकने भरलेली बाटली अशी तयारी करूनच सकाळच्या व्यायामाला सुरुवात करतात.
पार्कच्या प्रवेशद्वारावर दगडात कोरलेले सनई चौघडा वादकांचे शिल्प आहे. पार्कमध्ये दीड किलोमीटरचा व्यास असलेला ‘जॉगिंग ट्रॅक’ आहे. या ट्रॅकभोवती कडुलिंब, फुलांची झाडे आहेत. पार्कमध्ये तळे आहे. तळ्यावर पाणी पिण्यासाठी विविध जातींचे पक्षी येतात. पार्कमधील कारंजे हे येथील एक आकर्षण आहे. गवतावर पाणी फवारण्यासाठी बसवलेल्या स्प्रिंकलचाही अनुभव आल्हाददायक असतो. सेंट्रल पार्कच्या बाहेर पदपथावर योगासने केली जातात. यातील काही जण गटाने योगासने करतात. योगासन वा ‘लाफ्टर क्लब’च्या घोळक्यांमध्ये अनेक जण सेवानिवृत्त अधिकारी असतात.
पार्कमध्ये नागरिकांसाठी स्वच्छतागृहाची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. पावसाळा सोडल्यास इतर सर्व ऋतूंमध्ये चालणाऱ्यांची येथे कमी नसते.
पार्कबाहेर कारली, दुधी, कडुलिंब, तुळसी, गाजर, कोकम, आवळा आदी फळांचे रस मिळतात. रणजित मोहिते हे येथे फळांच्या रसाची सेवा देतात. शेतातील भाजी आदल्या दिवशी वाशीच्या बाजारातून विकत घ्यायची आणि पहाटे चार वाजता त्याचा रस बनवून सकाळी नऊ वाजेपर्यंत चार तरुण येथे रस विकत असतात.
पार्कला लागून असलेल्या इस्कॉन मंदिरासमोरील पदपथावर शेतमाल विकणाऱ्या महिला बसलेल्या असतात. तेथून अनेक जण दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणातील भाजीचा बंदोबस्त करतात. सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक लखीना यांनी सेंट्रल पार्कची उभारणी केली. नवी मुंबईमध्ये नियोजित शहराचे आदर्शवादी म्हणून खारघर आणि परिसराची उभारणी करण्यात आली. त्यात सेन्ट्रल पार्कचा समावेश आहे. लंडनमधील प्रसिद्ध ‘हाईडपार्क’च्या संकल्पनेवर येथे हे भव्य उद्यान उभारण्यात आले. यात १०३ हेक्टर जमिनीवर गोल्फकोर्स आणि ८० हेक्टर जागेवर सेंट्रल पार्क वसण्यिाचा मानस होता; परंतु प्रकल्प निर्मितीदरम्यान काही तांत्रिक अडचणींमुळे २५ हेक्टरवर सेन्ट्रल उभारले गेले, तर ५७ हेक्टरवर गोल्फकोर्स आहे. आल्हाददायक विस्तीर्ण हिरवळ हे येथील प्रमुख आकर्षण आहे.