लोकसत्ता टीम
नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कोथिंबीर आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. नाशिकची कोथिंबीर जुडी मागील आठवड्यात १५-१८ रुपयांवरुन आता २५-३० रुपयांवर वधारली आहे. एक महिना दर चढेच राहतील असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
एपीएमसी बाजारात पुणे व नाशिकमधून कोथिंबीर दाखल होते. बाजारात सोमवारी १ लाख ३५ हजार ५०० क्विंटल आवक झाली असून तेच मागील आठवड्यात १ लाख ९८ हजार १०० क्विंटल आवक झाली होती. सध्या कडक उन्हाळा पडला असून त्याचा पिकांवर परिणाम होत आहे. सततच्या उन्हाच्या झळा बसत असल्याने कोथिंबीर पिवळी पडत आहे. तसेच आवक ही घटली आहे.
गृहिणी प्रत्येक पदार्थत प्रामुख्याने कोथिंबीर वापरण्यास अधिक पसंती देत असतात. त्यामुळे आवक घटल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असून प्रतिजुडी दरात १० ते १२ रुपयांची वाढ झाली आहे. पुण्याची कोथिंबीर जुडी ८-१२ रुपयांवरून १०-१६ रुपयांवर तर नाशिकची कोथिंबीर १५-१८ रुपयांवरून २५-३० रुपयांवर विक्री होत आहे.
उन्हाच्या तडाख्याने कोथिंबीरच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. परिणामी एपीएमसीत आवक कमी होत आहे. त्यामुळे दरात वाढ झाली असून महिनाभर दर चढेच राहतील. – संदीप काळे, व्यापारी, एपीएमसी