नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी बाजारात वर्षभर मक्याच्या पिवळ्या कणसांचा हंगाम सुरू असतो. पावसाळा सुरू होताच चवीला उत्तम असलेला गावरान पांढरा मका कणीस दाखल होण्यास सुरुवात होत असते. मात्र गावरान मक्याच्या हंगामाला विलंब होत असून १५ जुलै नंतर बाजारात दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. बाजारात सध्या पिवळा मका दाखल होत आहे.
पावसाळ्यात ओलेचिंब भिजल्यानंतर गरमागरम मक्याच्या कणासला अधिक मागणी असते. पावसाळ्यात खवय्यांचा मका कणीस खाण्याकडे अधिक कल असतो. यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने गावरान मक्याचा हंगाम देखील लांबला आहे. एपीएमसी बाजारात वर्षभर नाशिक, पुणे येथून पिवळा म्हणजेच ‘अमेरिकन स्वीट कॉर्न’ उपलब्ध असतो.
हेही वाचा… पनवेल: सुनियोजित वसाहतीमधील भुयारी मार्ग पाण्याखाली
मात्र पावसाळा सुरू होताच चवीला उत्तम असलेला पांढरा गावरान मका दाखल होण्यास सुरुवात होते. जून महिन्यात कराड मधून दाखल होतात, मात्र यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने या मक्याच्या हंगामाला १५जुलै नंतर सुरुवात होईल असे मत घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केल आहे. सध्या बाजारात १९५ क्विंटल आवक असून येत्या १५ दिवसात आवक अधिक वाढेल.
हेही वाचा… काळीसावळी मुलगी झाल्याने विवाहितेचा जाच, पती आणि नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल
सध्या घाऊक बाजारात प्रतिक्विंटल १५००-२०००रुपये तर ८० नगाच्या गोणीला ३००-४००रुपये बाजारभाव आहे. तर किरकोळीत प्रतिनग १५-२०रुपयांनी विक्री होत आहे. आणखीन पंधरा दिवसांनी हंगाम सुरू होईल असे मत घाऊक फळ व्यापऱ्यांनी व्यक्त केले. त्यामुळे अधिक प्रमाणात गावरान पांढऱ्या कणसांचा आस्वाद घेता येणार आहे.