नवी मुंबई : शहरात पालिकेच्या प्रभावी लसीकरण मोहिमेला लसतुटवड्याच्या अडथळ्यांची अडचण कायम आहे. नवी मुंबई महापालिकेला ६ जुलैनंतरच ४ दिवसांनंतर १० जुलैला लस मिळाली, तीसुद्धा कमी प्रमाणात. त्यामुळे मंगळवारी पालिका रुग्णालयातच ६० वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेचे लसीकरण तर १८ वर्षांवरील नागरिकांना कोवॅक्सिनचे दुसऱ्या मात्रेचे लसीकरण होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
मागील आठवड्यात फक्त दोनच दिवस लस मळाली होती. शनिवारी पालिकेला ६४३० कोविशिल्ड व ८०० कोवॅक्सिनच्या लस कुप्या मिळाल्या. अपुऱ्या लसपुरवठ्यामुळे पालिकेला मंगळवारीही ठरावीक केंद्रावरच लसीकरण करता येणार आहे.
लस कमी मिळत असल्याने जास्तीत जास्त घराबाहेर असलेल्या घटकांमुळे संसर्ग अधिक पसरण्याचा धोका लक्षात घेत या घटकांचे उपलब्ध लशींतून लसीकरणावर भर दिला आहे. सोमवारी सोसायट्यांच्या सुरक्षारक्षकांसाठी ऐरोली आणि नेरूळ येथील महापालिका सार्वजनिक रुग्णालयात
लसीकरण आयोजित करण्यात आले होते. नेरूळ येथे ३४६ सुरक्षारक्षकांनी तसेच ऐरोली येथे २०८ सुरक्षारक्षकांनी लसीकरण करून घेतले. अशाप्रकारे ५५४ सोसायटी सुरक्षारक्षक यांना लस देण्यात आली. लसीकरणाला वेग येण्यासाठी महापालिकेच्यावतीने लस खरेदीची प्रक्रियाही सुरू आहे.